- राजकुमार जोंधळे,लातूरयेथील बार्शी रोडवरील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणाऱ्या गायत्री विष्णुकांत इंद्राळे हिने परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या दिवशी ओढणीने गळफास घेतला. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजता घडली.
पोलिसांनी सांगितले की, नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मंग्याळ येथील विद्यार्थिनी गायत्री इंद्राळे (वय १७) ही लातुरातील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत होती.
मंगळवारी दुपारी २ ते ५ या वेळेत प्रथम सत्रात राहिलेला शेवटचा पेपर होता. मात्र, गायत्री दुपारी ३ वाजताच वसतिगृहावर दाखल झाली. परीक्षा सुरु असल्याने इतर सोबतच्या मुली परीक्षा हॉलमध्येच होत्या. याचदरम्यान, गायत्रीने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली.
पेपर सुटल्यावर खोलीवर मुली दाखल झाल्या. त्यांनी दार वाजविले. आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून डोकावले असता गायत्री गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस आले. उत्तरीय तपासणीसाठी प्रेत शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
दहावीला ९६ टक्के गुण
गायत्रीला दहावीत ९६ टक्के गुण मिळाले होते. तिला गुणवत्तेवर तंत्रनिकेतनमध्ये संगणक अभियांत्रिकी शाखेसाठी प्रवेश मिळाला होता. घटनेची माहिती कळाल्यानंतर तिचे कुटुंबीय सायंकाळी उशिरा लातुरात पोहोचले.
गायत्रीने परीक्षेच्या ताणतणावातून आत्महत्या केली, की अन्य कारण आहे, याचा पोलीस तपास करीत आहेत. पालकांच्या जबाबानंतर वस्तुस्थिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.
प्रथम सत्रातील विषय राहिले होते
गायत्री इंद्राळे हिने वसतिगृहातील खोलीवर गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मला दिली. मी सध्या बंगळुरू येथे आहे. गायत्रीचे प्रथम सत्रातील काही विषय राहिले होते. सध्या ती द्वितीय सत्रातील पेपर देत होती. -सूर्यकांत राठोड, प्र.प्राचार्य, लातूर