Latur: दुपारी मुलाने संपवलं जीवन, रात्री शेतात आईचाही सापडला पोत्यात पुरलेला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 16:45 IST2025-08-08T16:40:12+5:302025-08-08T16:45:02+5:30

रेणापूर तालुक्यातील सांगवी येथील घटनेने खळबळ

Son ends life by hanging himself in the afternoon, mother's body found buried in field at night | Latur: दुपारी मुलाने संपवलं जीवन, रात्री शेतात आईचाही सापडला पोत्यात पुरलेला मृतदेह

Latur: दुपारी मुलाने संपवलं जीवन, रात्री शेतात आईचाही सापडला पोत्यात पुरलेला मृतदेह

रेणापूर (जि.लातूर) : तालुक्यातील सांगवी येथील एकाने पिंपळफाटा येथे खुल्या प्लॉटमध्ये असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, मयत व्यक्तीच्या आईचाही मृतदेह गावातील शेतात रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. पोलिस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षकही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सांगवी येथील काकासाहेब विनोद जाधव (वय ४८) यांनी रेणापूर पिंपळफाटा येथील शिवनेरी धाब्याच्या पाठीमागे, गावाकडे जाणाऱ्या पाठीमागच्या रस्त्याच्या बाजूस असलेल्या प्लॉटधील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याची माहिती मयताचा मेहुणा विनायक कोंडीराम जगदाळे (रा. ईटी, ता. रेणापूर) यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन स्पॉट पंचनामा करून मृतदेहास खाली काढले. त्यानंतर काकासाहेब वेणुनाथ जाधव यांचा मृतदेह रेणापूर येथील शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात नोंद करून तपास विपीन मामडगे यांच्याकडे देण्यात आला. दरम्यान, सांगवी येथे जाधव यांच्या शेतात आई समंदर वेणुनाथ जाधव (७०) यांचा मृतदेह पोत्यात बांधून खड्ड्यात पुरून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे आता पोलिसही चक्रावले आहेत.

गावात वेगळीच सुरू होती चर्चा...
गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या काकासाहेब विनोद जाधव याने दुपारी आपल्या आईला शेताकडे नेले होते. घटनेनंतर आईही गायब असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे ग्रामस्थांनी सांगवी शिवारात असलेल्या जाधव यांच्या शेत परिसरात आईचा शोध सुरू केला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शेतात आईचा मृतदेह खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी ग्रामस्थांनी रेणापूर पोलिसांना माहिती देताच पोलिसांचे पथक रात्री १० वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले आहे. पंचनामा करून तो मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

आईच्या खुनाचा संशय
वृद्ध आईला शेतात घेऊन गेलेल्या मुलानेच आईचा खून करून तिला खड्ड्यात पुरले असावे , त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलिस अधीक्षक अमोल तांबे, सहायक पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, बीट अंमलदार विश्वनाथ गिरी, आदी उपस्थित आहेत. पोलिस याप्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

Web Title: Son ends life by hanging himself in the afternoon, mother's body found buried in field at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.