साहेब, माझ्या २० एकर शेतीचे आता नदीपात्र झाले हो ! मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 16:33 IST2025-09-25T16:33:10+5:302025-09-25T16:33:47+5:30
मांजरा आणि तेरणा नद्यांचा संगम नेहमीच या परिसरासाठी वरदान ठरला होता. पण, यावर्षी तोच 'वरदान' 'शाप' बनून आला.

साहेब, माझ्या २० एकर शेतीचे आता नदीपात्र झाले हो ! मुख्यमंत्र्यांसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
- बालाजी थेटे
औराद शहाजनी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी येथील शेतकरी शिवपुत्र आग्रे यांचा आवाज थरथरत होता. त्यांच्या डोळ्यात, गेल्या १५ दिवसांपासून पुराच्या पाण्यात बुडालेल्या २० एकर शेतीचे दुःख स्पष्ट दिसत होते. मुख्यमंत्री समोर असताना, शिवपुत्र आग्रे यांनी हात जोडले आणि म्हणाले, साहेब, तुम्हीच आमचे मायबाप... या संकटातून आमची सुटका करा! त्यांच्या या एका वाक्यात अनेक शेतकऱ्यांचे हृदय तुटण्याचे दुःख व्यक्त झाले.
मांजरा आणि तेरणा नद्यांचा संगम नेहमीच या परिसरासाठी वरदान ठरला होता. पण, यावर्षी तोच 'वरदान' 'शाप' बनून आला. नद्यांनी आपला मार्ग बदलून, शिवपुत्र यांच्या शेतीतून नवा प्रवाह तयार केला. ज्वारी, सोयाबीन, उडीद, ऊस. गेल्या १५ दिवसांपासून ही सर्व पिके पाण्याखाली आहेत. नुसती पिकेच नाही, तर जमिनीचा कसही पुराच्या पाण्यासोबत वाहून गेला. होत्याचे नव्हते झालेले आहे. शिवार पाण्याखाली आहे. कर्नाटकतले पाणी बॅक वॉटर महाराष्ट्रात आले आहे. त्यात या परिसरातील जमीन पाण्याखाली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त झालेल्या भावना हृदय पिळवटणाऱ्या होत्या.
शिवपुत्र आग्रे यांच्यासह अमोल बोंडगे, चंद्रकांत बोंडगे आणि रावसाहेब मुळे, उत्तम लासुणे, रामदास खरटमोल, खासीमुल्ल, जलील नाईकवाडे आदी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनीही आपली व्यथा मांडली. खरीप तर गेलाच आहे, पण, आता रब्बीची पेरणी कशी करायची? शेतीची जागाच राहिली नाही, असा त्यांचा प्रश्न होता. या प्रश्नात केवळ शेतीची चिंता नव्हती, तर कुटुंबाचे भविष्य आणि उदरनिर्वाहाची भीती होती.
या अस्वस्थ क्षणी, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांना समजून घेतले. त्यांनी शिवपुत्र आग्रे यांना धीर दिला आणि म्हणाले, मी तुमच्या पाठीशी आहे. ही केवळ एक घोषणा नव्हती, तर संकटात सापडलेल्या एका मोठ्या कुटुंबाला दिलेला आधार होता. त्यांनी तत्काळ मदत आणि नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले. तसेच, भविष्यात पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याचे वचनही दिले.
यावेळी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर माजी मंत्री आ. संजय बनसोडे, अभिमन्यू पवार आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पण, या भेटीमागचा खरा अर्थ होता, एका शेतकऱ्याचे हृदय, ज्याने आपले दुःख व्यक्त केले आणि त्याला मिळालेला दिलासा. ही गोष्ट फक्त नुकसानीची नाही, तर माणुसकी आणि संकटाच्या काळात मदतीचा हात पुढे करण्याची आहे.