धक्कादायक! लिपिकाकडून शाळेतच विद्यार्थिनींचा विनयभंग; तिघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 15:20 IST2025-11-28T15:18:47+5:302025-11-28T15:20:02+5:30
याबाबत पीडित मुली वरिष्ठांकडे गेल्या आणि घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी याबाबत असं घडल्याचा पुरावा मागितला.

धक्कादायक! लिपिकाकडून शाळेतच विद्यार्थिनींचा विनयभंग; तिघांविरोधात गुन्हा दाखल
लातूर : शहरातील एका संस्थेतील लिपिकाने विनयभंग केल्याची घटना समोर आली असून, याबाबत विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात लिपिकासह अन्य दोघांविरोधात विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोस्को) कायद्यानुसार गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लिपिकाला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले, गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास संस्थेतील लिपिक दत्तात्रय मार्तंड भुतंमपल्ले ( वय ५३, रा. लातूर) याने विनयभंग केला व अश्लील बोलल्याचे पीडित मुलीने सांगितले. घडला प्रकार तिने आपल्या मैत्रिणीला सांगितला. मग, एका-एका मुलींनी आपल्याबाबतही असेच घडल्याचे सांगितले. याबाबत पीडित मुली वरिष्ठांकडे गेल्या आणि घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी याबाबत असं घडल्याचा पुरावा मागितला. शिवाय, मुलींचे म्हणणे ऐकून घेतले नाही असे तक्रारीत म्हटले आहे. अखेर पीडित मुलीने याबाबत घरी माहिती दिली. पालकांनी तातडीने पोलिस ठाणे गाठून माहिती दिली. दरम्यान, शाळेत धाव घेत संतप्त नागरिकांनी जाब विचारला. याबाबत पीडित मुलींच्या जबाबावरून पोलिस ठाण्यात लिपिक दत्तात्रय मार्तंड भुतंमपल्ले, दयानंद कांबळे आणि सत्यभामा नागिमे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी समिरसिंह साळवे करीत आहेत.
सात मुलींकडे विचारपूस...
पालक आणि पोलिसांनी मुलींना धीर देत अधिक विचारपूस केली असता असा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सात मुलींसोबत घडल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिस अधिक कसून चौकशी करत आहेत. आतापर्यंत सात पीडित मुलींचे जबाब नोंदविले आहेत.
-समीरसिंह साळवे, डीवायएसपी, लातूर