धक्कादायक ! माजी सैनिकाची बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 13:07 IST2022-04-15T12:59:43+5:302022-04-15T13:07:12+5:30

निवृत्तीनंतर ते उदगीरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.

Shocking! Ex-soldier commits suicide by shooting himself with a gun | धक्कादायक ! माजी सैनिकाची बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या

धक्कादायक ! माजी सैनिकाची बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या

उदगीर : येथील जय संतोषीमाता नगर भागात राहणाऱ्या एका माजी सैनिकाने  बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी  सायंकाळच्या सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या बाबत उदगीरच्या ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

याबाबत ग्रामीण पोलिसांच्या सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की , तोंडचिर ( ता. उदगीर ) येथील रहिवासी असलेले माजी सैनिक संजयकुमार चंद्रहार जाधव ( वय ५६ वर्षे ) हे उदगीर शहरातील जय संतोषीमाता नगर भागात राहत होते. ते उदगीरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास उदगीर येथील राहत्या घरी त्यांनी त्यांच्या जवळील असलेल्या बंदुकीतील गोळी स्वतःवर झाडून घेतली. 

बंदुकीची गोळी त्यांच्या छातीत लागल्याने ते गंभीर जखमी झाले. नातलगांनी त्यांना लगेच उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी मयताचे भाऊ मारोती चंद्रहार जाधव यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यू  नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र तारू हे करीत आहेत. 

Web Title: Shocking! Ex-soldier commits suicide by shooting himself with a gun