खामसवाडीत अफूची शेती! ३० गोण्या अफू जप्त
By राजकुमार जोंधळे | Updated: February 14, 2025 23:32 IST2025-02-14T23:25:16+5:302025-02-14T23:32:13+5:30
याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती...

खामसवाडीत अफूची शेती! ३० गोण्या अफू जप्त
कळंब (जि. धाराशिव) : भल्या सकाळी शिराढोण पोलिसांचे पथक थेट कार्यक्षेत्रातील एका गावाचे शिवार गाठते. तेथील एका शेतकऱ्याच्या शेतात पोलिसांची पावले पडतात. इथं त्यांना चक्क उसाच्या फडात ‘अफू’चे आंतरपीक दिसते. दिवसभर पंचनामा, काढणी, मोजणी करून तीस एक छोट्या गोण्या घेऊन ठाण्यात पोलिस दाखल होतात. ही खळबळजनक कारवाई कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे करण्यात आली आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
शिराढोण (ता. कळंब) पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील खामसवाडी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात अफूची झाडे लावली असल्याची गोपनीय माहिती शिराढोण पोलिसांना मिळते. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ शिराढोण पोलिस ठाण्याचे सपोनि. कल्याण नेहरकर, पोउपनि. अनिल तांबडे व अंमलदाराचे पथक त्या अमली पदार्थाच्या शोधार्थ खामसवाडी मंगरूळ रस्त्यावरील भवानी शेत परिसरातील एका शेतकऱ्याचे शेत गाठते. याठिकाणी त्यांना उसाच्या फडात आंतरपीक म्हणून घेतलेली अफूची झाडे दिसून आली.
याची तत्काळ वरिष्ठांना माहिती देत पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली. यानंतर कळंब पोलिस ठाण्याची कुमकही दाखल झाली. दिवसभर याची चौकशी चालली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. या क्षेत्रातील अफूच्या झाडाला बोंडे लागलेली दिसून आली. यानंतर रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कारवाई सुरू होती. शिराढोण पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी ठाण मांडून होते. याची परिसरात चर्चा सुरू झाली अन् एकच खळबळ उडाली.
मोजमाप उशिरापर्यंत चालले... -
घटनास्थळावर पंचनामा झाला. यानंतर त्या पिकाची काढणी झाली. ते छोट्या गोण्यांत भरण्यात आले. हे पीक तीस गोण्यांपेक्षा जास्त होते. घटनास्थळी मोजणी झाल्यावर परत रात्री शिराढोण पोलिस ठाण्यात पथक अन् मुद्देमाल रवाना झाला. तिथे परत एकदा मोजणी केल्याचे समजते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. याप्रकरणी सपोनि. कल्याण नेहरकर यांच्याशी संपर्क साधला असता, माहिती गुन्हा दाखल झाल्यावर देण्यात येईल, असे सांगण्यात आले.