भरधाव वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर जखमी; उदगीर-लातूर महामार्गावरील घटना
By राजकुमार जोंधळे | Updated: February 10, 2025 03:02 IST2025-02-10T03:01:06+5:302025-02-10T03:02:00+5:30
दीपक बंडपा मठपती (वय ३० रा. बाऱ्हाळी ता. मुखेड जि. नांदेड) मयत तर विनायक मठपती (वय १७ रा. भगीरथी नगर, उदगीर) असे गंभीर जखमीचे नाव आहे.

भरधाव वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर जखमी; उदगीर-लातूर महामार्गावरील घटना
उदगीर (जि. लातूर) : भरधाव हायवाने दिलेल्या जाेराच्या धडकेत दुचाकीचालक जागीच ठार झाला तर दुसरा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात उदगीर-नळेगाव-लातूर महामार्गावरील लोहारा गावानजीक रविवारी रात्री ७ः३० ते ८ वाजण्याच्या सुमारास घडला. दीपक बंडपा मठपती (वय ३० रा. बाऱ्हाळी ता. मुखेड जि. नांदेड) मयत तर विनायक मठपती (वय १७ रा. भगीरथी नगर, उदगीर) असे गंभीर जखमीचे नाव आहे.
जखमींच्या नातेवाईकांनी सांगितले, मयत दीपक मठपती आणि विनायक मठपती हे दाेघेही रविवारी रात्री दुचाकीवरुन (एम.एच. २४ बी.ई. ७९८४) लातूरकडे जात होते. दरम्यान, रात्री ७:३० ते ८ वाजण्याच्या सुमारास लोहारा गावानजीक समोरून येणारा भरधाव हायवा अवजड वाहनाने (एम.एच. ४४ टी. १४१४) त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक दीपक मठपती यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विनायक मठपती याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघाताच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उदगीर ग्रामीण पोलिसांनी मृतदेह रुग्णवाहिकेतून उदगीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. तर जखमी झालेल्या विनायक मठपती याच्यावर उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.