तालुक्यातील मोठे गाव म्हणून निटूरला ओळखले जाते. येथे मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे सतत रेलचेल असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा गावातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सतत विविध कारणांनी विजेचा लपंडाव सुरू आहे. विशेष म्हणजे, वारा अथवा पाऊस नसतानाही वीज गुल होत आहे. नागरिकांनी चौकशी केल्यानंतर वरूनच बिघाड आहे, असे सांगून निरुत्तर केले जाते.
सततच्या या उत्तरामुळे नेमका वर कुठे बिघाड आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. तो बिघाड कधी दुरुस्त होईल आणि सुरळीत वीजपुरवठा होईल, याची उत्सुकता निटूरकरांना लागली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सायंकाळी गायब झालेली वीज मध्यरात्री अथवा दुसऱ्या दिवशी सकाळी येत आहे. तर दिवसा गेलेली वीज रात्रीच्या वेळी येत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामाेरे जावे लागत आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून कुठलीही दाद मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे.