भरधाव टिप्परने चिरडल्याने आई- मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 17:34 IST2019-09-14T17:32:09+5:302019-09-14T17:34:00+5:30
टिप्पर व मोटरसायकलचा अपघात

भरधाव टिप्परने चिरडल्याने आई- मुलाचा मृत्यू
रेणापूर (जि़ लातूर) : लातूर- अंबाजोगाई मार्गावरील महापूरपाटीजवळ टिप्पर व मोटरसायकलचा अपघात होऊन दीड वर्षाच्या बालकासह त्याच्या आईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११़३० वा़ च्या सुमारास घडली़
यशोदा तुकाराम शिंदाळे (२७) व प्रतिक तुकाराम शिंदाळे (वय दीड वर्ष) असे मयत आई- मुलाचे नाव आहे़ रेणापूर तालुक्यातील कुंभारी (शेरा) येथील तुकाराम बाबुराव शिंदाळे (३५), त्यांची पत्नी यशोदा व मुलगा प्रतिक हे तिघे दुचाकी (एमएच २४, ६८०२) वरुन शनिवारी सकाळी लातूरला जात होते़ दरम्यान, ते महापूर पाटीच्या पुलाजवळ पोहोचले असता त्यांच्या दुचाकीस टिप्पर (एमएच २४, एयू १८३०) ने पाठीमागून जोराची धडक दिली़ यात दुचाकीवरील यशोदा व प्रतिक हे दोघे रस्त्यावर पडले आणि टिप्परच्या मागील चाकाखाली चेंगरले़ या अपघातात यशोदा शिंदाळे, प्रतिक शिंदाळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला़
या अपघातात तुकाराम शिंदाळे हे जखमी झाले असून त्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ घटनास्थळास रेणापूरचे पोनि़ गोरख दिवे व पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली़