लातुरात दुकानांना मध्यरात्री २ वाजता भीषण आग; अग्निशमनच्या तीन बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न
By राजकुमार जोंधळे | Updated: May 15, 2025 03:24 IST2025-05-15T03:23:27+5:302025-05-15T03:24:00+5:30
छत्रपती चौक परिसरात रिंग रोडलगत चार दुकानांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कार्यालयात बुधवारी रात्री १.४५ वाजण्याच्या सुमारास मिळाली.

लातुरात दुकानांना मध्यरात्री २ वाजता भीषण आग; अग्निशमनच्या तीन बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न
राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील पाच नंबर चौक ते छत्रपती चौकाकडे जाणाऱ्या रिंग रोडवर एका बारलगत असलेल्या चार दुकानांना गुरुवारी पहाटे १.३० ते २ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले.
छत्रपती चौक परिसरात रिंग रोडलगत चार दुकानांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या कार्यालयात पहाटे १.४५ वाजण्याच्या सुमारास मिळाली. या माहितीनंतर एकापाठोपाठ तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी पहाटे ५ वाजेपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. आग एवढी भीषण होती की, चारही दुकानांतील साहित्य जळून खाक झाल्याचे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. ही आग नेमकी कशी लागली, याची माहिती मात्र पहाटेपर्यंत मिळू शकली नाही.
दुकानांतील साहित्य आगीत खाक़...
छत्रपती चौक परिसरात रिंग रोड लगत असलेल्या चारही दुकानांना पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
फोन खणखणताच जवान दाखल...
लातुरातील अग्निशमन दलाच्या मुख्य कार्यालयात पहाटे १.४५ वाजता फोन खणखणला अन् लागलीच अग्निशमन दलाचे तीन बंब, जवान घटनास्थळाकडे रवाना झाले.