अल्पवयीन मुलीला त्रास देत विनयभंग करणाऱ्याला अटक; २० तासांमध्ये न्यायालयात दाेषाराेपपत्र...
By राजकुमार जोंधळे | Updated: November 18, 2025 21:30 IST2025-11-18T21:30:35+5:302025-11-18T21:30:44+5:30
राजकुमार जाेंधळे लातूर : एका अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या आणि विनयभंग करणाऱ्या आरोपीला गांधी चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी अटक केली. ...

अल्पवयीन मुलीला त्रास देत विनयभंग करणाऱ्याला अटक; २० तासांमध्ये न्यायालयात दाेषाराेपपत्र...
राजकुमार जाेंधळे
लातूर : एका अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या आणि विनयभंग करणाऱ्या आरोपीला गांधी चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी अटक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अवघ्या २० तासांमध्ये गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आराेपीविराेधात लातूर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील गांधी चौक ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचा प्रकार घडल्याची तक्रार पीडित मुलीने दिली. आराेपीने तक्रारदार मुलीच्या घरात शिरुन विनयभंग केला. यापूर्वीही आरोपीने पीडितेचा वारंवार पाठलाग केला होता. शिवाय, तिच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. मुलीला व कुटुंबीयांवर वाढत्या त्रासाने मानसिक दबाव निर्माण झाला होता. तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्रकरण संवेदनशील असल्याने तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी आढावा घेत कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, लातूर शहराचे डीवायएसपी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी दोन स्वतंत्र शोधपथके तयार केली. या पथकांनी आरोपीची माहिती मिळविली. इसराईल कलीम पठाण (वय २७, रा. गौसपुरा, लातूर) याला अटक केली. आरोपीविरुद्ध सबळ पुरावा संकलित करून २० तासात लातूर न्यायालयात दाेषारोपपत्र सादर केले.
ही कारवाई गांधी चाैक ठाण्याचे पाेनि. सुनिल रेजितवाड, पोउपनि. गणेश चित्ते, पोउपनि पोवार, राजेंद्र टेकाळे, प्रकाश भोसले, रविसन जाधव, राहुल दरोडे, सचिन चंद्रपाटले, योगेश चिंचोलीकर, रवि कानगुले, सचिन जाधव, शिवानंद गिरबोने, संध्या कांबळे, सुमन कोरे, लता बनसोडे, राखी गायकवाड यांच्या पथकाने केली.