लातूर : यंदा हवामान विभागाने भरपूर पाऊस पडणार असल्याचे संकेत दिल्याने पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग पूर निवारण परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्वतयारी करत असून, साहित्य सामुग्री तयार ठेवली आहे. शिवाय, नदीकाठच्या गावांमध्येही स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन निवारण समिती कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा या दोन नद्यांना पूर येतो. लातूर, रेणापूर, निलंगा या तीन तालुक्यांतून मांजरा नदी वाहते तर तेरणा नदी औसा आणि निलंगा या दोन तालुक्यांतून जाते. चार तालुक्यांमधील १६१ गावे नदीकाठी आहेत. यातील ५८ गावांना पुराचा धोका असतो. या नदीकाठच्या गावांच्या आपत्ती आराखड्याचे काम सुरू असून, संबंधित गावांना पूर्वसूचनाही देण्यात आल्या आहेत. पुरामुळे नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ जर आली तर स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. तर शहरांमध्ये नालेसफाईची कामे सुरू झाली असून, ज्या सखल भागांमध्ये पाणी साचते, त्याचा निचरा करण्यासंदर्भातही उपाययोजना केल्या जात आहेत. धोकादायक इमारतींचीही पाहणी करण्यात येत आहे. शिवाय, धोकादायक वृक्षही कोठे आहेत का, याबाबत मनपा व नगर परिषदेंतर्गत पाहणी सुरू झाली आहे.
पूरबाधित क्षेत्र
मांजरा व तेरणा काठची ५८ गावे पूरबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यात लातूर, रेणापूर, निलंगा, औसा तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. या दोन नद्यांच्या काठावर १६१ गावे आहेत. परंतु, यातील ५८ गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे विशेष करून या ५८ गावांवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे लक्ष राहणार आहे.
अग्निशमन दल सज्ज
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, मनपाचे अग्निशमन दल, दहाही तालुक्यांचे तहसील कार्यालयांतील आपत्ती व्यवस्थापन विभाग, नगर परिषदा, नगर पंचायतीचे आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाले आहेत.
अग्निशामन दलाने पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी सर्व साहित्य दुरुस्त करून ठेवले आहे. शिवाय, नव्यानेही साहित्य खरेदी केले आहे. त्यामध्ये बोट, लाईफ जॅकेट, जाळी, बोट रेस्क्यू, अंडर वॉटर स्टॉर्च, वूडकटर, हेल्मेट, नेट, दोरी आदी साहित्यांचा समावेश आहे.
शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण
लातूर शहरासह तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शहरांत धोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणाचे काम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने सुरू आहे.
लातूर शहरामध्ये नालेसफाईचे काम सुरू झाले असून, त्यासाठी मनपाने नवीन जेसीबी खरेदी केले आहेत.
सखल भागांमध्ये पाणी साचणार नाही, या अनुषंगाने मनपाचा स्वच्छता विभाग गेल्या आठ दिवसांपासून कामाला लागला आहे.
यंदा पाऊसकाळ चांगला राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने वर्तविले आहेत. मोठा पाऊस होणार असल्याने नद्यांना पूर येऊ शकतो. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनासह तालुका आणि नगरपालिका स्तरावरील आपत्ती निवारण विभाग सज्ज झाले आहेत. तालुक्याच्या दहा ठिकाणी आणि पाच उपविभागीय स्तरावर तसेच अग्निशमन दलाच्या ठिकाणी पूर निवारणाचे सर्व साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. - साकेब उस्मानी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी