लातुरात भाजप, काँग्रेसची लढाई अटीतटीची; मतदारसंघांवरील वर्चस्व टिकविण्याचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:38 IST2026-02-05T18:38:18+5:302026-02-05T18:38:54+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील ५९ गटांत आणि ११८ गणांत चुरस वाढली आहे.

लातुरात भाजप, काँग्रेसची लढाई अटीतटीची; मतदारसंघांवरील वर्चस्व टिकविण्याचे आव्हान
- हरी मोकाशे
लातूर : जिल्हा परिषदेच्या रणसंग्रामात अवघे काही तास शिल्लक असताना सहाही विधानसभा मतदारसंघातील वर्चस्व टिकविण्याचे आव्हान आमदारांपुढे आहे. प्रामुख्याने भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील लढाई अटीतटीची होत असून, एकमेकांवर शाब्दिक प्रहार जोरदार सुरू आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवर पुन्हा आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यातील ५९ गटांत आणि ११८ गणांत चुरस वाढली आहे. स्थानिक नेत्यांबरोबर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतल्याने राजकीय वातावरण आणखीन तापले आहे. निलंगा, औसा, देवणी, शिरूर अनंतपाळ, लातूर, रेणापुरात भाजप आणि काँग्रेस नेतेमंडळींकडून शाब्दिक हल्ले चढविले जात आहेत. विरोधक तेवढ्याच प्रभावीपणे प्रतिहल्ले करीत आहेत.
मतदारसंघावरील प्रभुत्वासाठी कसोटी
भाजपचे माजी मंत्री आ. संभाजी पाटील - निलंगेकर यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघावर, आ. अभिमन्यू पवार यांनी औसा, आ. रमेश कराड यांनी लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघावरील पकड कमी होऊ नये म्हणून सर्व शक्ती पणाला लावली आहे.
राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते तथा सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे अहमदपूर - चाकूर, तर माजी मंत्री आ. संजय बनसोडे हे उदगीर विधानसभा मतदारसंघात तळ ठोकून आहेत.
काँग्रेसची लढाई एकहाती
काँग्रेसचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील गट, गणांबरोबर जिल्ह्यात काँग्रेसची एकहाती सत्ता आणण्यासाठी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे. विशेषत: जिल्ह्यात काँग्रेसच्या एकाही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. ते स्वबळावर किल्ला लढवीत आहेत.
टीकेची धार वाढली
काँग्रेस पायाभूत सुविधा, शेती, आरोग्य, महिला सक्षमीकरणाबरोबर भाजपवर टीकेचे घाव घालत आहे. भाजपनेही केंद्र, राज्यातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगत ‘हाता’चा वार चुकवत प्रतिहल्ला करीत आहेत. निलंगा, औसा, लातूर तालुक्यात जिव्हारी लागणाऱ्या शाब्दिक चकमकीमुळे राजकीय वातावरण आणखीन तंग झाले आहे. महायुती व महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची समीकरणे काही गटांत जुळली आहेत. काही ठिकाणी मैत्रिपूर्ण सामने होत आहेत. त्यावर विजयाची गणिते राहणार आहेत.