लातूर हादरले! आईचा खून करून उसाच्या शेतात पुरला मृतदेह; नंतर मुलानेही संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 13:13 IST2025-08-09T13:13:00+5:302025-08-09T13:13:38+5:30
शेती विक्रीच्या वादातून कुटुंबाची शोकांतिका; माय-लेकावर एकत्र अंत्यसंस्कार

लातूर हादरले! आईचा खून करून उसाच्या शेतात पुरला मृतदेह; नंतर मुलानेही संपवलं जीवन
रेणापूर (जि. लातूर) : शेती विक्रीस विरोध करीत असलेल्या वयोवृद्ध आईचा खून करून मुलानेही आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली होती. याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी मृत मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, माय-लेकाच्या पार्थिवावर एकाच चितेवर सांगवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सांगवी येथील काकासाहेब वेणुनाथ जाधव (वय ४८) याने रेणापूर पिंपळफाटा येथे लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर काही तासांतच त्याच्या आईचाही मृतदेह गावातील शेतात रात्री ९ वाजेच्या सुमारास आढळून आला. पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षकही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी करून तपासाच्या सूचना केल्या. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी केली. शुक्रवारी मृताचा मुलगा व आजीचा नातू शुभम काकासाहेब जाधव यांनी रेणापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह उसाच्या शेतात पुरला
माझे वडील काकासाहेब जाधव हे आजीकडे वारंवार शेत विक्री करावयाचे आहे म्हणत होते. मात्र, त्यास आजी विरोध करत होती. त्यामुळे आजी समिंद्रबाई वेणुनाथ जाधव (वय ८०) यांना वडील काकासाहेब यांनी जबर मारहाण केली तसेच तोंड दाबून जिवे मारले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या शेतातील उसाच्या फडात आजीचा मृतहेद पुरला. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रेणापूर पोलिस ठाण्यात मृत काकासाहेब जाधव यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
माय-लेकावर एकत्र अंत्यसंस्कार
मुलगा काकासाहेब वेणुनाथ जाधव व आई समिंद्रबाई वेणुनाथ जाधव यांच्या मृतदेहाची रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. शुक्रवारी सकाळी दोन्हीही मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर सांगवी येथे माय-लेकाच्या पार्थिवावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एकच मुलगा, चार मुली
समिंद्रबाई जाधव यांना चार मुली व एक मुलगा होता. सर्वांचेच लग्न झाले आहे. मुलगा काकासाहेब यानेच आई जमीन विक्री करू देत नसल्याने तिचा खून केला अन् स्वत:नेही गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी चारही मुलींनी योग्य तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.