लातूर हादरले! फ्रेशर पार्टीत घात झाला, क्षुल्लक वादातून काठीचा वार, विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:15 IST2025-10-13T13:11:51+5:302025-10-13T13:15:40+5:30
फ्रेशर पार्टीतून वाद, डाेक्यात काठी घातली; पाचव्या दिवशी त्या जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू

लातूर हादरले! फ्रेशर पार्टीत घात झाला, क्षुल्लक वादातून काठीचा वार, विद्यार्थ्याचा मृत्यू
लातूर : फ्रेशर पार्टीतून झालेल्या वादानंतर बाचाबाची झाली. यातूनच एका २३ वर्षीय विद्यार्थ्याच्या डाेक्यात काठी घातल्याची घटना ७ ऑक्टाेबर राेजी रात्री लातुरातील कळंब राेडवर घडली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा पाचव्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत एमआयडीसी ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. यातील दाेघा संशयितांना पाेलिसांनी ताब्यात घेतले असून, इतर आराेपी पसार झाले आहेत.
पाेलिसांनी सांगितले, सूरज धाेंडिबा शिंदे (वय २३, रा. बिंदगीहाळ, ता. लातूर) हा सध्या लातुरातील प्रगतीनगरात वास्तव्याला हाेता. ताे एमआयडीसी परिसरात असलेल्या एका संस्थेत डीएमएलटीचे शिक्षण घेत हाेता. दरम्यान, ७ ऑक्टाेबर राेजी रात्री फ्रेशर पार्टी सुरू हाेती. यातूनच रात्री १० वाजेच्या सुमरास वाद झाला. खुर्च्या फेकाफेकीतून मारहाण करण्यात आली. यामध्ये आदित्य गायकवाड याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. याच वादावादीतून आराेपींनी फाेन करून इतर मुलांना बाेलावून घेतले. यावेळी हातात काठी घेतले काही जण घटनास्थळी आले आणि मयत सूरज धाेंडिबा शिंदे याच्या डाेक्यात काठीने जबर मारहाण केली.
यामध्ये गंभीर जखमी झालेला सूरज हा जाग्यावरच काेसळला. यावेळी घटनास्थळावरून सर्वच आराेपींनी पळ काढला. त्याला लातुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. याबाबत प्रारंभी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, अतिदक्षता विभागात सुरू असलेल्या उपचार सुरू असताना अखेर शनिवारी मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. याबाबत एमआयडीसी पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी दाेघा संशयित आराेपींना ताब्यात घेतले, तर अन्य आराेपी पसार झाले आहेत. तपास पाेलिस उपनिरीक्षक पाेंगूलवार हे करीत आहेत.
आराेपींच्या मुसक्या लवकरच आवळणार
फ्रेशर पार्टीतून झालेल्या वादातून, बाचाबाचीतून सूरज शिंदे याच्या डाेक्यात काठीने जबर मारहाण करण्यात आली. या गुन्ह्यात किती आराेपी आहेत, याचा तपास पाेलिस करीत आहे. आतापर्यंत दाेघांना ताब्यात घेतले असून, इतर आराेपींच्याही लवकरच मुसक्या आवळल्या जातील.
- समाधान चवरे, पाेलिस निरीक्षक, लातूर