Latur: कलकोटीत लाभार्थ्यांना लाभ न देता लाखोंचा घोटाळा; 'नरेगा'चा तांत्रिक सहायक कार्यमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 12:21 IST2025-11-22T12:20:51+5:302025-11-22T12:21:34+5:30
या प्रकरणात पूर्वी ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात आले होते, तसेच सरपंच यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

Latur: कलकोटीत लाभार्थ्यांना लाभ न देता लाखोंचा घोटाळा; 'नरेगा'चा तांत्रिक सहायक कार्यमुक्त
संदीप अंकलकोटे
चाकूर : तालुक्यातील कलकोटी येथील ग्रामपंचायत अंतर्गत कामात लाभार्थ्यांना लाभ न देता लाखो रुपयांचा घोटाळा करून अपहार केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेने चौकशी समिती नेमली आहे. चौकशी समितीचा अहवाल आणि पंचायत समिती केलेली चौकशी यात नरेगा कक्षातील तांत्रिक सहायक एस. आर. धैर्य यांना अपहार केल्याचा ठपका ठेवून पंचायत समितीतून कार्यमुक्त केले आहे.
प्राथमिक चौकशी अहवालानुसार कलकोटी येथील महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जनावर गोठा बांधकामाचे लाभार्थी नारायण कोंपले, मधुकर कोपले, उद्धव कोंपले, बालाजी कोंपले, सुधाकर केंपले यांचे सर्व उपलब्ध अभिलेख संबंधाचे जबाब व स्थळपाहणी करण्यात आली. सदरील कामाच्या स्तरावरील जिओ टॅगमध्ये आढळून आलेला गैरप्रकार यावरून सदरील कामावर निधी खर्च झाल्याचे दिसून आले. मात्र स्थळपाहणी, लाभार्थ्यांच्या जबाबानुसार सदरील काम पूर्ण झाल्याचे आढळून आलेले नाही. तसेच तालुक्यातील बावलगाव, अजनसोंडा (बु) येथील कामांमध्ये अपहार झाल्याचे दिसून आले आहे, असे पत्र पंचायत समितीने नरेगा कक्षातील तांत्रिक सहायक एस. आर. धैर्य यांना दिले आहे.
काय म्हटले आहे आदेशात
सर्व मस्टर जिओ टॅग कार्यक्षेत्रातील प्रस्तावाच्या मंजुरीसाठी आवश्यक त्या क्षेत्रभेट, कागदपत्रे गोळा करणे, ग्रामपंचायतीतील दिलेले कामाचे प्रमाण राखणे, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सेवक तसेच लाभार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करणे, लाभार्थ्यांचे अचूक मोजमापे घेणे, मूल्यांकन करणे, मजूर, हजेरी पत्रक, कामाची मोजमाप पुस्तिका, अभिलेखे पंचायत समिती स्तरावर प्राधान्याने बिनचूक सादर होतील, या दृष्टीने कार्यवाही करणे. या पद्धतीने कामकाज करणे विहित असताना देखील त्याप्रमाणे कामकाज न करता जाणीवपूर्वक अनियमितता झाल्याचे सिध्द होत आहे, असे या आदेशात म्हटले आहे.
गटविकास अधिकाऱ्यांनी केली कारवाई
शासन परिपत्रकाचे अनुपालन न करणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे, झालेल्या अपहाराबाबत नरेगा कक्षातील तांत्रिक सहायक एस. आर. धैर्य यांना जबाबदार धरून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांनी तांत्रिक सहायक धैर्य यांना कार्यमुक्त केले आहे. तसेच, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे उपस्थित राहून अहवाल सादर करावा, असे आदेश दिले आहेत. उपोषणकर्त्यांनी जी मागणी लावून धरली होती त्यात प्रथमदर्शनी अपहार झाल्याचे आता उघड झाले आहे.
चौकशी सुरूच
या प्रकरणात पूर्वी ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात आले होते, तसेच सरपंच यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणात अजून कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच आंदोलनकर्त्यांनी केलेल्या मागणीची चौकशी येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आश्वासन चौकशी अधिकारी तथा लातूरचे गटविकास अधिकारी श्याम गोडभरले यांनी दिले आहे.