'आपले लातूर-सुरक्षित लातूर': ३१८ पॉइंट्सवरील पोलिस गस्तीवर आता GPS अन् QR कोडची नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 11:40 IST2026-03-16T11:37:02+5:302026-03-16T11:40:01+5:30
लातूरच्या कोपऱ्या-कोपऱ्यात क्यूआर कोडचा वेढा; ३१८ पॉइंट्सवर पोलिसांची डिजिटल उपस्थिती

'आपले लातूर-सुरक्षित लातूर': ३१८ पॉइंट्सवरील पोलिस गस्तीवर आता GPS अन् QR कोडची नजर
लातूर : शहरातील सुरक्षा भक्कम करण्यासाठी, गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लातूर जिल्हा पोलिस दलाने ‘आपले लातूर-सुरक्षित लातूर’ या उपक्रमांतर्गत जीपीएस आधारित क्यूआर कोड स्कॅनर यंत्रणा सुरू करण्यात आली आहे.
लातूर शहरातील जवळपास ३१८ संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी हे क्यूआर कोड बसवण्यात आले आहेत. या प्रणालीमुळे पोलिसांना गस्तीवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आहे. चार्ली पेट्रोलिंग पथक, दामिनी पथक व वाहतूक शाखेचे पोलिस या ठिकाणी नियमित भेट देऊन ‘ई-पोलिस’ ॲपद्वारे क्यूआर कोड स्कॅन करतील. स्कॅन केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला स्वतःचा सेल्फी फोटो तिथे अपलोड करावा लागेल, ज्यामुळे त्यांची उपस्थिती वेळेसह आणि लोकेशनसह (जीपीएस) वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ समजणार आहे. हा उपक्रम पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. यामध्ये लातूर शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे, अंमलदार पांडुरंग सगरे हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
क्यूआर काेडची ही प्रमुख उद्दिष्टे
नियमित गस्त : दर १२ तासांच्या कालावधीत किमान ३१८ ठिकाणांना भेट देऊन पोलिस उपस्थितीची खात्री करणे शक्य हाेणार आहे.
गुन्हेगारीला आळा : संवेदनशील भागात सतत गस्त असल्याने गुन्हेगारांवर वचक निर्माण हाेणार आहे.
पारदर्शकता : गस्त व्यवस्थेचे अचूक नियोजन आणि शिस्तबद्ध अंमलबजावणी करता येणार आहे.
हे क्यूआर कोड खराब करणाऱ्यांविराेधात कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे प्रकार आढळल्यास पोलिसांना कळवावे.
- अमाेल तांबे, पाेलिस अधीक्षक, लातूर