Latur: नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण; दोन महिला कर्मचाऱ्यांना पाेलिस काेठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:55 IST2026-01-07T12:54:46+5:302026-01-07T12:55:59+5:30
लातूर पाेलिसांकडून ‘झिरो टॉलरन्स’ धोरणानुसार तपास सुरू

Latur: नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण; दोन महिला कर्मचाऱ्यांना पाेलिस काेठडी
लातूर : येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १२ वर्षीय अनुष्का किरणकुमार पाटोळे या विद्यार्थिनीच्या मृत्यूने खळबळ उडाला. या प्रकरणात लातूर पोलिसांनी तातडीने पावले उचलत पल्लवी सचिन कणसे आणि लता दगडू गायकवाड या दोघांना ६ जानेवारी रोजी अटक केली. लातूर न्यायालयात मंगळवारी हजर केले असता, न्यायालयाने ९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास आता ‘फास्ट ट्रॅक’वर सुरू आहे.
पाेलिसांनी सांगितले, अनुष्का पाटोळे हिचा ४ जानेवारी २०२६ रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. दरम्यान, या प्रकरणात वडील किरणकुमार पाटोळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाेघा महिलांविराेधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०८, ११५ (२), ३(५) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास केला जात आहे. अनुष्का पाटाेळेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन साेमवारी दुपारनंतर महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इन-कॅमेरा करण्यात आले.
पाेलिसांनी गाेळा केले आहेत डिजिटल पुरावे...
‘ई-साक्ष’ ॲपद्वारे घटनास्थळाचे चित्रीकरण करण्यात आले असून, शाळेचे सीसीटीव्ही फुटेज आणि हजेरी पट जप्त करण्यात आले आहे. पाेलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून याचा तपास जलद गतीने सुरू केला आहे.
तक्रारदारासह इतर नातेवाइकांचे जबाब
अनुष्का पाटाेळे मृत्यू प्रकरणात तक्रारदारासह साक्षीदारांचे जबाब बीएनएसएस कलम १८३ अन्वये नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, पाेलिसांकडून न्यायालयीन जबाब नाेंदवण्यात येत आहेत.
डीवायएसपी करणार मृत्यू प्रकरणाचा तपास
लातूर पोलिसांनी या प्रकरणात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी समीर साळवे यांचे विशेष पथक या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी कसून तपास करत आहे.