लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:46 IST2026-01-14T19:44:21+5:302026-01-14T19:46:24+5:30
समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला चार लाख रुपयांचे साहाय्य मंजूर

लातूरच्या जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला?
लातूर : येथील जवाहर नवोदय विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणामध्ये पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही गतीने केली. या प्रकरणात प्राप्त तक्रारीनंतर पोलिसांकडून पारदर्शक तपास सुरू करण्यात आला. या तपासाच्या आधारे विद्यालयातील दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे दोन्ही कर्मचारी सध्या कोठडीत आहेत. तसेच विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना समाज कल्याण विभागामार्फत ४ लाख रुपयांचे साहाय्य मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून विद्यालयामध्ये समुपदेशक नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकरण गांभीर्याने हाताळले जात आहे. या दुःखद घटनेत मुलीच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत म्हणून समाज कल्याण विभागामार्फत ४ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे, पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनीही जवाहर नवोदय विद्यालयाला भेट देऊन विद्यार्थी, पालकांशी संवाद साधला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने अमलात आणण्याचे निर्देश जवाहर नवोदय प्रशासनाला दिले आहेत. विद्यार्थी सुरक्षिततेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय समितीच्या पुणे विभागीय सहायक आयुक्त पंकज जॅक्सन, प्राचार्य गणपती म्हस्के यांची बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. यावेळी विद्यार्थ्यासाठी समुपदेशक नियुक्तीची कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पुरावे जमविण्यासाठी पथक स्थापन...
जवाहर नवोदय विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यूबाबत तक्रार दाखल होताच पोलिसांनी कोणताही विलंब न करता तपासाची चक्रे तत्काळ फिरवली. प्राथमिक तपासात निष्पन्न झालेल्या पुराव्यांच्या आधारे दोन महिला कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. या अनुषंगाने जबाब नोंदविणे, पुरावे जमा करणे यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले. या अत्यंत संवेदनशील प्रकरणाची लातूर जिल्हा प्रशासन व लातूर पोलिसांनी तत्काळ दखल घेत, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, गुन्ह्यातील कोणताही दोषी सुटू नये, यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू आहे. लातूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी समीर साळवे यांच्या विशेष पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.