लातूर : “अनेकजण म्हणतात की माझी कार्यपद्धती मुंडे साहेबांसारखी नाही. हो, तशी नाही… पण ती त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच आहे. त्यांनी मला सांगितलं होतं, तुला गोपीनाथ मुंडे व्हायचं आहे, पण त्याची सुधारित आवृत्ती. आणि म्हणूनच मी स्वाभिमानाला धक्का न लावता राजकारण करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे.” अशा शब्दात मंत्री पंकजा मुंडे यांनी राजकारणातील त्यांची भूमिका स्पष्ट केली. लातूरमध्ये स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, “माझ्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं होतं, पंकजा, तू माझी वारस आहेस. हा वारसा केवळ संपत्ती किंवा पदाचा नव्हता, तर मूल्यांचा, स्वाभिमानाचा आणि जनतेच्या सेवाभावाचा होता. पण या वारशासोबत संघर्ष, कारस्थानं आणि अडचणीही माझ्या वाट्याला आल्या. पण वडिलांनी दिलेल्या वारशाला सुईच्या टोकाइतकाही धक्का लागू देणार नाही, हा माझा शब्द आहे.” अशी शब्दात मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कधीही तुकडे उचलू नको, नेहमीच बेरजेचं राजकारण करवडिलांची शिकवण सांगताना पंकजा म्हणाल्या, “मुंडेसाहेबांनी मला कधी काय करायचं हे शिकवलं नाही, पण काय करू नये हे मात्र शिकवलं. कुणी टाकलेले तुकडे उचलायचे नाहीत, परिस्थितीसमोर कधी झुकायचं नाही, कुणाबद्दल द्वेष बाळगायचा नाही… आणि नेहमीच गणित बेरजेचं करायचं.” त्यांनी हेही नमूद केलं की, “हीच शिकवण देवेंद्र फडणवीस यांनीही पाळली, आणि म्हणूनच आज आपण सत्तेत आहोत.”
प्रवासभर वाटत होते काहीतरी चमत्कार होईलमुंडे साहेबांच्या निधनाच्या आठवणी सांगताना पंकजा भावुक झाल्या. “त्यावेळी मी दिल्लीला पोहोचले. तिथे माझ्यासाठी कुणी ओळखीचं नव्हतं… फक्त देवेंद्र फडणवीस उभे होते. त्यांना पाहताच मी रडू कोसळले. प्रवासभर मला आशा होती की काहीतरी चमत्कार होईल, आणि मुंडे साहेब उठून बसतील… पण ती आशा तुटली,” असे सांगताना त्यांचा आवाज दाटून आला.