दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला लातुरात अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 18:29 IST2018-03-15T18:29:14+5:302018-03-15T18:29:14+5:30
: शहरातील मळवटीरोड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरुन बसलेल्या पाच जणांच्या टोळीला गांधी चौक पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली. याबाबत गुरुवारी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, २८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला लातुरात अटक
लातूर : शहरातील मळवटीरोड परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरुन बसलेल्या पाच जणांच्या टोळीला गांधी चौक पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा अटक केली. याबाबत गुरुवारी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, २८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, लातूर येथील श्री सिद्घेश्वर-श्री रत्नेश्वर देवस्थानच्या यात्री निवासस्थान परिसरात दरोडा टाकण्याची तयारी करीत असलेली माहिती गांधी चौक पोलिसांनी मिळाली. या माहितीच्या आधार पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. दरम्यान, यात्री निवासाच्या पोर्चमध्ये दरोड्याच्या तयारीत दबा धरुन बसलेल्या पाच जणांच्या टोळीवर पोलिसांनी झडप मारली. यावेळी संतोष उर्फ पापा बब्रुवान माने (रा. जयनगर, लातूर), हिरामण गणपती कांबळे (रा. जानवळ ता. चाकूर), अरबाज आयुबखान पठाण (रा. काळे गल्ली, लातूर), राजू बाबुराव चिंताले (रा. कोल्हे नगर, लातूर) आणि यशपाल खंडू शिरसाठ (रा. इंदिरा नगर, लातूर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून काठ्या, मिरची पूड, लोखंडी रॉड, चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत गांधी चौक पोलीस ठाण्यात पोलीस उप निरीक्षक महेश अंबादासराव गळगटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, २८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्रेहा पिंपरखेडे हे करीत आहेत.