पावसाने दिली हुलकावणी, वारे सुटल्याने वाढली शेतकऱ्यांची चिंता

By आशपाक पठाण | Published: July 10, 2023 04:56 PM2023-07-10T16:56:02+5:302023-07-10T16:58:30+5:30

लातूर जिल्ह्यात ५० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी; पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे लागले लक्ष

Farmers worry increased due to wind; Looking at the sky while waiting for the rain | पावसाने दिली हुलकावणी, वारे सुटल्याने वाढली शेतकऱ्यांची चिंता

पावसाने दिली हुलकावणी, वारे सुटल्याने वाढली शेतकऱ्यांची चिंता

googlenewsNext

लातूर : चार दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्या शेतकऱ्यांना बियाणे उगवण्याची तर न पेरणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पाऊस कधी पडेल याची चिंता लागली आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत जवळपास ५० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला आहे.

लातूर जिल्ह्यात खरिपाचे एकुण क्षेत्र ५ लाख ९९ हजार ४५५ हेक्टर्स आहे. त्यापैकी २ लाख ९९ हजार १११ हेक्टर्सवर खरिपाची पेरणी झाली आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दोन दिवस उघडीप मिळाल्याने घाईघाईत पेरणी करून घेतली. मात्र आता तीन दिवसांपासून नुसते वारेच सुटल्याने पेरलेलेही उगवते की नाही याची चिंता लागली आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही, असे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत बसले आहेत. पावसाने ओढ दिल्याने पेरणीचा हंगाम लांबला आहे. पहिल्या पावसात शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदी करून ठेवले. मात्र, पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. आतापर्यंत झालेल्या पेरणीत ९५ टक्के पेरा सोयाबीनचा झाला आहे. उर्वरित क्षेत्रावर तर सोयाबीनशिवाय इतर पिक घेणे कठीण होणार आहे.

शिरूर अनंतपाळ तालुका आघाडीवर...
जिल्ह्यात जवळपास ५० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी पिके उगवलीही आहेत. मात्र, चार दिवसांपासून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाने उघडीप दिल्याने झोप उडाली आहे.

निलंगा, अहमदपूर, चाकूर पिछाडीवर...
जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, चाकूर तालुक्यात अद्यापही सर्व भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. तर इतर तालुक्यात पाऊस झाला असला तरी ज्या भागात सुपिक जमिनी आहेत,अशाच ठिकाणी पेरणी झाली आहे. मात्र तीन दिवसांपासून वारे सुटल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. महागडी बियाणे, खते, औषधी, पेरणीचा खर्च वाया जाऊ नये, यासाठी शेतकरी प्रार्थना करीत आहेत.

ओल असेल तर करा पेरणी...
जमिनीत पेरणीयोग्य ओलावा असेल तर शेतकऱ्यांनी पेरणी करावी, पावसाने ओढ दिलेली आहे. अशा स्थितीत पेरणी करणे जोखमीचे ठरेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची प्रतिक्षा करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

कुठे किती झाली पेरणी...
लातूर ५३.३५
रेणापूर ४२.६९
औसा ६०.८३
निलंगा ३७.०३
देवणी ६२.२५
शिरूर अनंतपाळ ७९.८३
अहमदपूर ३४.३७
उदगीर ५७.७६
चाकूर ४४.७८
जळकोट ४७.९६
......................
एकूण पेरा : २, ९९,१११.५ हेक्टर्स

Web Title: Farmers worry increased due to wind; Looking at the sky while waiting for the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.