अवघ्या दोन मिनिटांत १७ आयफोनसह महागडे मोबाईल, लॅपटॉप लंपास; औशात सिनेस्टाईल चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:39 IST2025-05-27T16:35:52+5:302025-05-27T16:39:17+5:30
दुकान फोडून मोबाईल लाखोंचा माल लंपास

अवघ्या दोन मिनिटांत १७ आयफोनसह महागडे मोबाईल, लॅपटॉप लंपास; औशात सिनेस्टाईल चोरी
- महेबूब बक्षी
औसा (लातूर) : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तहसील कार्यालयासमोरच्या जीएम मोबाईल दुकानावर मंगळवारी पहाटे ३. १६ ते ३. १८ या वेळेत अज्ञात चोरट्यांनी पोलिसांना चकवा देत धाडसी चोरी केली. सिनेस्टाईल पद्धतीने कार रस्त्यावर लावून दुकानाचे शटर तोडत अवघ्या दोन मिनिटांत 17 आयफोन , 13 मोटोरोलो कंपनीचे मोबाईल, 3 डमी फोन्स आणि 2 लॅपटॉप असा लाखोंचा ऐवज लंपास केला. चोरीची माहिती मिळताच औसा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले असून सकाळी ठसे नमुने घेतले गेले आहेत.
अज्ञात चार चोरटे नवी कोरी कार घेऊन औसामधील मुख्य रस्त्यावर आले. त्यांनी प्रथम न्यायालयासमोरील दुसरे मोबाईल दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा श्वान भुंकल्यामुळे शेजारील लोक जागे झाले. हे लक्षात येताच चोरटे तिथून पळाले आणि पुढे जीएम मोबाईल दुकान फोडले. चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीती आणि संताप पसरला आहे. शासकीय कार्यालयासमोर अशा प्रकारची धाडसी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये सुरक्षा यंत्रणांबाबत शंका व्यक्त होत आहे.
केवळ दोन मिनिटांत दुकान साफ
संपूर्ण चोरीचा प्रकार दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कारमधून एकजण बाहेर न येता बसून राहिला, तर इतर तिघांनी शटर तोडून चोरी केली. सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरी केवळ दोन मिनिटांत पार पडली. चोरटे सराईत असल्याचे स्पष्ट दिसते. नंबर नसलेली नवी कार वापरून त्यांनी ३:१६ ते ३:१८ च्या दरम्यान ही चोरी केली. दुकानमालक अकबर मणियार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु आहे.