अतिवृष्टीमुळे पिकांच्या उत्पादनात होणार घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:20 IST2021-07-28T04:20:54+5:302021-07-28T04:20:54+5:30
जळकोट : तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार व भीज पावसामुळे सोयाबीन, तूर, ज्वारीची पिके पिवळी पडली आहेत. मर्यादेपेक्षा जास्त ...

अतिवृष्टीमुळे पिकांच्या उत्पादनात होणार घट
जळकोट : तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार व भीज पावसामुळे सोयाबीन, तूर, ज्वारीची पिके पिवळी पडली आहेत. मर्यादेपेक्षा जास्त पाऊस पडल्याने पिके पिवळी पडत असून, आगामी काळात या तिन्ही पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
जळकोट तालुक्यात आतापर्यंत ५२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर घोणशी मंडळात ३८६ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. जोरदार पावसामुळे तालुक्यातील जलसाठ्यात व साठवण तलावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, तालुक्यातील चौदा साठवण तलावात चांगला पाणीसाठा झाला आहे. तालुक्यात ३४ हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी २५ हजार हेक्टर पेरणीयोग्य आहे. त्यापैकी दहा हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे, तर उर्वरित क्षेत्रावर तुर, कापूस, ज्वारी, उडीद, मूग आदी पिके घेण्यात आली आहेत. गेल्या आठवड्यात पावसामुळे या पिकांच्या उत्पादनात बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अनेक ठिकाणच्या जमिनी पाण्याने खरडून गेल्र्या आहेत. पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून, लहान कोवळी पिके पिवळे पडली आहेत. त्यामुळे बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. जळकोट तालुका डोंगरीदरी, कपारी, मुरमाड जमिनीचा असल्याने या जमिनीला अतिवृष्टीचा पाऊस जास्तीचा झाला आहे. हलक्या जमिनीचे पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे आत्तापर्यंत झालेले नाही त्याचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
प्रकल्पातील पाणीसाठ्यात झाली वाढ...
तालुक्यातील हळद वाढवणा, रावणकोळा, माळहिप्परगा, जंगमवाडी, गुत्ती, घोणशी, सोनवळा, करंजी, जगळपूर, वांजरवाडा, डोंगर शेलदरा, ढोर सांगवी आदी प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील नदी, नाले भरून वाहत असून, विहिरी भरल्या आहेत.