मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शिक्षक पती- पत्नीचा वाहनाच्या धडकेने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 17:03 IST2019-05-08T17:00:42+5:302019-05-08T17:03:26+5:30
दोघे वळसंगी येथील जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते़

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शिक्षक पती- पत्नीचा वाहनाच्या धडकेने मृत्यू
शिरुर ताजबंद (जि़ लातूर) : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका शिक्षक पती- पत्नीचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला़ ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास शिरुर ताजबंदनजीक घडली़ याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
श्रावण रामराव सोमवंशी (५२) व त्यांची पत्नी प्रतीक्षा श्रावण सोमवंशी (४८, रा़ शिरुर ताजबंद) असे अपघातातमृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत़ शिरुर ताजबंद येथील श्रावण सोमवंशी व त्यांची पत्नी प्रतीक्षा सोमवंशी हे दोघे वळसंगी येथील जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत होते़ नेहमीप्रमाणे हे दोघे बुधवारी पहाटे ५़३० वा़ च्या सुमारास मुखेड रस्त्यानजीक मॉर्निंग वॉकला गेले होते़ दरम्यान, त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली़
या अपघातात प्रतीक्षा सोमवंशी या जागीच ठार झाल्या तर श्रावण सोमवंशी हे गंभीर जखमी झाले़ दरम्यान, अपघात झाल्याचे समजताच काही नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन श्रावण सोमवंशी यांना उपचारासाठी लातूरला हलविले़ मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला़ याप्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात रविंद्र आठखिळे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास सपोनि़ एम़जी़ जाधव करीत आहेत़