अहमदपुरात कोरोना बाधितांचा आलेख उतरला, गृहविलगीकरणात बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:19 AM2021-05-10T04:19:06+5:302021-05-10T04:19:06+5:30

अहमदपूर : तालुक्यात कोरोनाचा आलेख वाढला होता. मात्र, मे च्या पहिल्या आठवड्यात बाधितांचा आलेख उतरला आहे. तसेच गृहविलगीकरणात राहून ...

Corona infestation in Ahmedpur drops, home detachment recovery rises | अहमदपुरात कोरोना बाधितांचा आलेख उतरला, गृहविलगीकरणात बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

अहमदपुरात कोरोना बाधितांचा आलेख उतरला, गृहविलगीकरणात बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

Next

अहमदपूर : तालुक्यात कोरोनाचा आलेख वाढला होता. मात्र, मे च्या पहिल्या आठवड्यात बाधितांचा आलेख उतरला आहे. तसेच गृहविलगीकरणात राहून ठणठणीत होणाऱ्यांची रुग्ण संख्या ६ हजार २२७ अशी झाली आहे. चाचण्या वाढल्या असल्या तरी पॉझिटिव्ह निघण्याचे प्रमाण घटले आहे.

अहमदपूर तालुक्यात पहिल्या व दुसऱ्या या दोन्ही लाटेत एकूण ६ हजार ६७१ रुग्णांची नोंद झाली आहे. पहिली लाट मे २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत होती. त्यात १५९४ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर १ मार्चपासून ते ६ मेपर्यंत ५ हजार बाधितांची संख्या वाढली. मात्र, मे च्या पहिल्या आठवड्यात रुग्ण संख्येत घट झाली आहे. आरोग्य विभागाने बाधितांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये वाढ करून व त्यांना गृहविलगीकरणात ठेवून उपचार केल्यामुळे बाधित कमी झाल्याचे दिसून येत आहे.

मागील आठ दिवसांत एकूण २ हजार ९५६ चाचण्या केल्या. त्यात ६७१ बाधित आढळले. त्याचा पॉझिव्हिटी रेट ३२ टक्के होता. एप्रिलच्या मध्यावधीच्या काळात हा रेट ५० ते ६० टक्‍क्‍यांवर पोहोचला होता. दरम्यान, मे महिन्यात रुग्णसंख्येत कमालीची घट झाली आहे. नागरिकांनी नियमांचे केलेले पालन तसेच लसीकरणामुळे ही घट झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

तालुक्यात सर्वाधिक रुग्ण एप्रिलमध्ये आढळले. त्याची संख्या ३ हजारांच्या पुढे आहे. तसेच याच महिन्यात दररोज २५० पेक्षा जास्त पॉझिटिव्ह आढळत होते. मात्र, मे महिन्यात १०० पेक्षा कमी बाधित आढळत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तसेच कोविड केअर सेंटरमधील रुग्ण संख्याही घटली आहे. अहमदपूर कोविड केअर सेंटरमध्ये १५० जागा असताना केवळ ३० रुग्ण आहेत. शिरूरच्या सेंटरमध्ये एक आणि ग्रामीण रुग्णालयात दहा रुग्ण आहेत. संस्थात्मक विलगीकरणातही एकूण २२० जागा असताना केवळ २३ रुग्ण आहेत. तालुक्यात ऑक्सिजनयुक्त ७० खाटा असून दोन व्हेंटिलेटर आहे. सध्या ते रिकामे आहेत.

लसीकरण, नियमांमुळे रुग्ण संख्येत घट...

बाधित गृहविलगीकरण नियमांचे पालन करीत आहेत, औषधोपचाराला प्रतिसाद देत आहे. तसेच लसीकरणही होत आहे. त्यामुळे तालुक्यात रुग्ण संख्या कमी झाली आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे यांनी सांगितले.

सर्व उपाययोजना...

तालुक्यात पोलीस, महसूल, पालिका व आरोग्य विभागाच्या वतीने सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे बाधितांची रुग्ण संख्या घटली आहे, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

४०० जणांवर कारवाई...

विनाकारण, विनामास्क बाहेर फिरणाऱ्यांवर पालिकेच्या माध्यमातून कारवाई केली. त्यामुळे दोन दिवसांत बाहेर पडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. १५ दिवसांच्या कालावधीत ४०० जणांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे बाधितांच्या संख्येत घट झाल्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ म्हणाले.

मासिक रुग्णसंख्या...

मे २०२०- ८, जून- १२, जुलै- १५५, ऑगस्ट- ३९३, सप्टेंबर - ७२१, ऑक्टोबर- १८८, नोव्हेंबर- ३५, डिसेंबर- ६२, जानेवारी २०२१- २०, फेब्रुवारी- ५४, मार्च- ६२०, एप्रिल- ३ हजार ९९३, ६ मेपर्यंत ४८० अशी बाधित रुग्णांची संख्या आहे.

Web Title: Corona infestation in Ahmedpur drops, home detachment recovery rises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.