जयंतीवरून वाद? शेतात काम करणाऱ्या शिक्षकाचा खून; दहा जणांविरुद्ध गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Updated: April 27, 2025 03:20 IST2025-04-27T03:18:33+5:302025-04-27T03:20:46+5:30

आराेपीच्या अटकेनंतर तणाव निवळला...

Controversy over Jayanti Murder of a teacher working in the field | जयंतीवरून वाद? शेतात काम करणाऱ्या शिक्षकाचा खून; दहा जणांविरुद्ध गुन्हा

फाेटाे - गुरुलिंग हासुरे

कासार सिरसी (जि. लातूर) : जयंतीच्या वादातून वेगवेगळ्या समाजातील दाेन गटामध्ये मारहाणीची घटना घडली. यावेळी लाेकांची पळापळ झाली. गावालगतच्या शेतात काम करणाऱ्या शिक्षकालाही जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना औंढा (ता. निलंगा) येथे शनिवारी दुपारी १२ वाजता घडली. याबाबत कासार सिरसी पोलिस ठाण्यात दहा जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, औंढा गावात शुक्रवार, २५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीदरम्यान वेगवेगळ्या समाजात वाद झाला हाेता. ताे आपसामध्ये मिटलाही हाेता. मात्र, शनिवार, २६ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास गावातील दत्तू माराेती गायकवाड याने जयंतीवरुन वाद का केला? असे म्हणून दुसऱ्या समाजातील दाेघांसाेबत हुज्जत घातली. याचे पर्यावसान हाणामारीमध्ये झाले. यावेळी लोकांची एकच पळापळ सुरू झाली. बडूर येथील शिक्षक गुरुलिंग अशोक हासुरे (वय ३८) हे आपल्या शेतात काम करत हाेते. आरोपींनी हाही औंढा गावचाच आहे. त्याने हासुरे यांना जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाचा मृत्यू झाला.

याबाबत कासार सिरसी ठाण्यात मयताचे काका गुंडाप्पा शिवाप्पा हासुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दत्तू माराेती गायकवाड (रा.औंढा), अजय महेश चौंडा, अझर मोहम्मद, आदित्य मोरे, गजेंद्र शिवराज सरवदे, स्वप्निल सूर्यवंशी (सर्व रा. कासार सिरसी), संजय लक्ष्मण गायकवाड, राजेंद्र गाेरख गायकवाड, शहाजी किशन गायकवाड (रा. औंढा) याच्यासह अन्य एका अनाेळखीविराेधात गुन्हा दाखल केला. तपास पोउपनि. अजय पाटील हे करीत आहेत.

आराेपींच्या अटकेनंतर
ठाण्यातील तणाव निवळला...
मयत शिक्षकाच्या नातेवाईकांनी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पोलिसांनी यातील काही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर तणावाचे वातावरण निवळले. मयत शिक्षक गुरुलिंग हासूरे यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, आई, एक भाऊ असा परिवार आहे.

 

Web Title: Controversy over Jayanti Murder of a teacher working in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.