कोंथिबिरीच्या वाहनास कंटेनरची धडक; औसा येथील दोन तरुणांचा समृद्धी महामार्गावर मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 20:09 IST2025-09-29T20:09:17+5:302025-09-29T20:09:35+5:30
समृद्धी महामार्गावरील कारंजा (जि.वाशीम) येथे भीषण अपघात

कोंथिबिरीच्या वाहनास कंटेनरची धडक; औसा येथील दोन तरुणांचा समृद्धी महामार्गावर मृत्यू
- महेबूब बक्षी
औसा (जि.लातूर) : औशातील चारचाकी वाहनातून नाशिकहून नागपूरला कोंथिबीर घेऊन जाताना समृद्धी महामार्गावरील कारंजा (जि.वाशीम) येथे भीषण अपघात झाला. त्यात औशातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री १:३० वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातात अन्य दोघे जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
औसा येथील एका व्यापाऱ्यांची नाशिकहून कोंथिबीर पिकअपमध्ये (एमएच ४४, यू १८८३) भरून चालक इम्रान मकबूल शेख (वय २८, रा.आझाद चौक, औसा) आणि इम्रान रफीक शेख (२६, रा.बिलालनगर, औसा) हे दोघे नागपूरला जात होते. समृद्धी महामार्गावरील कारंजा येथील चॅनल नं. २११ येथे अगोदरच अपघातग्रस्त झालेल्या वाहनामुळे पिकअपच्या गतीत व्यत्यय आला. गती कमी होताच, छत्तीसगडकडे निघालेल्या भरधाव आयशर ट्रक (सीसी ०९, एव्ही ०५७५) ने जोराची धडक दिली. या अपघातात इम्रान मकबूल शेख आणि इम्रान रफिक शेख यांना गंभीर मार लागला. त्यात त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वाशिम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो मंगरुळपीर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याचे पोलिस हवालदार विजय जाधव यांनी सांगितले.
एकुलता एक मुलगा गेला
भीषण अपघातात इम्रान रफिक शेख हा एकुलता एक मुलगा मरण पावल्याने, आई-वडिलासह कुटुंबाचा आधारच हिरावला गेला आहे. ज्याच्यासाठी जगायचे, तो सोडून गेला, असे म्हणत आईने हंबरडा फोडला होता.
पंधरा दिवसांपूर्वीच वडिलांचे निधन
येथील इम्रान मकबूल शेख यांच्या वडिलांचे पंधरा दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी इम्रानवर होती. भीषण अपघातात पुन्हा त्यांच्या कुटुंबावर आघात झाला. वयोवृद्ध आईसह पत्नी व तीन चिमुकले पोरके झाले आहेत.