बटईने शेती केली, पण अभ्यास सोडला नाही; लातूरच्या शेतकऱ्याने 'केबीसी'त जिंकले २५ लाख!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 15:45 IST2025-12-09T15:40:39+5:302025-12-09T15:45:02+5:30
दुग्ध व्यवसायातील फसवणुकीने हतबल झालेला शेतकरी KBC च्या हॉट सीटवर; २५ लाखांनी बदलले आयुष्य.

बटईने शेती केली, पण अभ्यास सोडला नाही; लातूरच्या शेतकऱ्याने 'केबीसी'त जिंकले २५ लाख!
- बालाजी कटके
रेणापूर (जि. लातूर) : शेतीत नवनवीन प्रयोगाबरोबर दुग्ध व्यवसाय करणाऱ्या कोष्टगाव (ता. रेणापूर) येथील ४३ वर्षीय शेतकऱ्याने केबीसीत दाखल होऊन तब्बल २५ लाखांचे बक्षीस पटकाविले आहे. त्यांची तालुक्याबरोबर जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे.
रेणापूर तालुक्यातील कोष्टगाव येथील नरहरी डाके यांनी १२ वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बीएस्सीच्या द्वितीय वर्षात असताना घराच्या आर्थिक अडचणींमुळे शेती व दुग्ध व्यवसायाकडे वळले. सुरुवातीस म्हशींचे पालन करून दुग्ध व्यवसायाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर पशुधन संख्या २० पर्यंत वाढविली. दररोज ८० ते ९० लिटर दूध संकलन करून गावात व रेणापूर, लातूरला विक्री करीत. परंतु, हरियाणातील म्हशीच्या व्यापाऱ्यांनी फसविले. त्यामुळे दुग्ध व्यवसाय बंद पडला.
बटईने शेती अन् अभ्यास
संकटात असतानाही नरहरी डाके यांनी जिद्द व चिकाटी सोडली नाही. स्वतःच्या एक एकर शेतीबरोबर इतरांची १०- १२ एकर शेती करून भाजीपाल्याचे उत्पादन घेऊ लागले. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. दरम्यान, ते सिने अभिनेते अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा कराेडपती हा कार्यक्रम सन २००० पासून पाहू लागले. २० वर्षे ही मालिका पाहिल्यानंतर त्यात आपणही सहभागी व्हावे म्हणून सन २०१९-२० मध्ये मनोदय केला.
चार वर्षे आले अपयश
सोशल मीडियाच्या माध्यमातून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी माहिती घेण्यास सुरुवात केली. २०१९ मध्ये त्यांनी केबीसीसाठी नोंदणी केली. परंतु, चार वर्षे त्यात यश आले नाही. पुन्हा २०२५ मध्ये नोंदणी करून प्रयत्न केला. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी ते पात्र ठरले. त्यासाठीची परीक्षा, मुलाखत दिली. त्यात सर्वाधिक गुण मिळाल्याने स्पर्धेसाठी पात्र ठरल्याचा फोन आला. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुंबईत केबीसीत अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासमोर उभे राहिले. त्यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत २५ लाखांचे बक्षीस जिंकले.
केबीसी स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी चार ते पाच वर्षे संघर्ष केला. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने स्वत:च्या एकरभर शेतीबरोबर बटईने शेती केली आणि अभ्यासही केला. जिद्द अन् बुद्धिमत्तेच्या जोरावर २५ लाख कमविले.
- नरहरी डाके.