विवाह समारंभ आटोपून गावाकडे परतणाऱ्याचा विवस्त्र करुन निर्घृण खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 13:39 IST2022-04-25T13:37:11+5:302022-04-25T13:39:33+5:30
चाकूर तालुक्यातील मोहनाळ शिवारात सोमवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली.

विवाह समारंभ आटोपून गावाकडे परतणाऱ्याचा विवस्त्र करुन निर्घृण खून
चाकूर (जि. लातूर) : विवाह समारंभ आटोपून गावाकडे परतणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात बांबूने मारहाण करुन खून करण्यात आला आहे. मारेकऱ्यांनी मयताच्या अंगावर कपडेही ठेवले नाहीत. ही घटना सोमवारी सकाळी तालुक्यातील मोहनाळ शिवारात आढळून आली आहे.
अंकुश देवराव डावरे (४०, रा. अहमदपूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. अंकुश डावरे यांची घरणी ही सासुरवाडी आहे. ते रविवारी विवाह समारंभासाठी घरणी येथे आले होते. विवाह समारंभ आटोपून दुपारी ४ वा. च्या सुमारास गावाकडे जात असल्याचे सांगून निघाले होते. दरम्यान, चाकूर तालुक्यातील मोहनाळ शिवारात सोमवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यावरुन सहाय्यक पोलीस अधिक्षक अमरसिंह देशमुख, पोलीस उपनिरीक्षक कपिल पाटील, पोहेकॉ. हणमंत आरदवाड, मारोती तुडमे, सुभाष हारणे, सुग्रीव मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
मयत हा अंकुश डावरे असल्याचे निष्पन्न झाले. अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्या डोक्यात बांबूने जबर मारहाण करुन जागीच ठार केले. तसेच त्यांच्या अंगावर कपडेही ठेवले नाहीत. मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला बांबू आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अधिक तपासासाठी पोलिसांचे पथक अहमदपूरला रवाना झाले आहे.