दहावीच्या प्रवेशासाठी सात हजारांची लाच, आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिकेस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 19:15 IST2025-08-13T19:14:22+5:302025-08-13T19:15:15+5:30
या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहावीच्या प्रवेशासाठी सात हजारांची लाच, आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिकेस अटक
उदगीर (जि. लातूर) : येथील बोरताळा पाटीजवळील एका आश्रमशाळेत दहावी वर्गात प्रवेश देण्यासाठी सात हजारांची लाच घेताना मुख्याध्यापिकेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून अटक केली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, देगलूर रोडवर असलेल्या शंकर माध्यमिक आश्रमशाळा येथील मुख्याध्यापिका त्रिवेणी बाबुराव शेरे (वय ४१) हिने तक्रारदारास दहावी वर्गात प्रवेश देण्यासाठी सोमवारी सात हजार रुपयांची लाचेची स्पष्ट मागणी केली. मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शाळेत पंचायत समक्ष त्यांनी सात हजार रुपयांची लाच स्वीकारली. याबाबत कसलीही पावती तक्रारदारास दिली नाही.
या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संतोष बर्गे हे करीत आहेत.