वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
By राजकुमार जोंधळे | Updated: April 25, 2025 23:48 IST2025-04-25T23:48:17+5:302025-04-25T23:48:52+5:30
लातुरातील तीन कुटुंब सुखरूप : पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...

वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
राजकुमार जाेंधळे / लातूर : काश्मिरात आणखी एक दिवस मुक्काम करुन वैष्णवदेवीला जाण्याचा प्लॅन हाेता. मात्र, तिकीट न मिळाल्याने २१ एप्रिल राेजी आम्ही पहलगाम साेडले आणि परतीच्या प्रवासाला लागलाे. दुसऱ्या दिवशी २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यातून धडकल्या. त्यावेळी अंगावर काटा उभा ठाकला. अवघ्या काही तासांपूर्वीच आपण हा परिसर साेडला आणि अनर्थ टळला, अशीच भावना लातुरातील तीनही कुटुंबांनी व्यक्त केली.
१५ एप्रिल रोजी पहाटे पुणे येथून दिल्ली आणि दिल्ली विमानतळावरून श्रीनगर असा प्रवास करत लातुरातील गणेश गोले, गंगाधर करीमुंगी आणि रामेश्वरी कलशेट्टी हे मुलांना सुटी असल्याने परिवारासह एका खाजगी टुरिस्ट कंपनीच्या पॅकेजमधून सहा दिवसांसाठी काश्मीरला पोहोचले. त्यात श्रीनगर येथे दाेन दिवस, हाउस बोट येथे एक दिवस आणि पहलगाम येथे १९ ते २१ एप्रिल असे तीन दिवस हाेते. पहलगाम येथे निसर्गाचा आनंद घेत फाेटेही काढले. भाेजनाचा आनंद घेत डोंगर-दऱ्या पाहत होताे. शिवाय, २१ एप्रिल राेजी तारखेला ‘बेताब व्हॅली’ येथून घोड्यावरून पहाडी परिसरात भटकंती करायचं ठरलं हाेतं. मात्र, सगळ्यांचं मत जुळले नाही. त्यामुळे घोड्यावरून बेताब व्हॅली पाहण्याचा निर्णय रद्द झाला. जेथे हा भ्याड हल्ला झाला त्याच ठिकाणचा परिसर...त्यानंतर साइड सिनरी पाहत आम्ही २१ एप्रिलला पहलगाममधून श्रीनगरला परतलाे.
मध्यरात्रीचा प्रवास करून आम्ही पुणे येथे पोहोचलो. तेथे पोहोचल्यानंतर समजलं की, पहलगाम येथे दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला झाला. त्यावेळी वाटले की आपण तेथून अवघ्या काही तासांपूर्वी परतलाे. आणखी एक दिवसाचा मुक्काम पहलगाममध्ये करून वैष्णवीदेवीला जाण्याचा प्लॅन केला असता तर आपल्यावरही हा प्रसंग बेतला असता, असेच वाटू लागले. मात्र, वैष्णवदेवीचे तिकीट न मिळाल्याने २१ तारखेलाच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलाे आणि पुण्यात दाखल झालाे, अशी माहिती गणेश गाेले यांनी दिली.
पहलगाम प्रवासामध्ये हाेती सहा लहान मुले...
२२ एप्रिल राेजी पहलगामध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचे वृत्त समजले. त्यानंतर तेथील परिस्थिती वृत्त वाहिन्यांवरून पाहत असताना अंगावर शहारा आला. या वृत्ताने पहिल्यांदा जबर धक्काच बसला. तीनही कुटुंबातील सदस्य बेचैन झाले. सहा लहान मुलांसह हे तीनही कुटुंब पुणे येथून लातुरात सुखरूप परतल्याने जीव भांड्यात पडला.