बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगाराच्या टोळीकडून ९ गुन्ह्यांची उकल, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:05 IST2025-08-12T15:55:22+5:302025-08-12T16:05:01+5:30
या टोळीने लातूर जिल्ह्यात तसेच शेजारील बीड, परभणी, कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगाराच्या टोळीकडून ९ गुन्ह्यांची उकल, २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
लातूर : बीड जिल्ह्यातील एका गुन्हेगाराच्या टोळीला घातक शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील नऊ गुन्ह्यांची उकल झाली आहे. टोळीकडून २४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत सांगितले.
यावेळी अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, स्थागुशाचे पोनि. सुधाकर बावकर, सपोनि. सदानंद भुजबळ उपस्थित होते. जिल्हा पोलिस अधीक्षक अमोल तांबे म्हणाले, औसा व भादा पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने २ ते ३ ऑगस्टच्या मध्यरात्री
रिहान मुस्तफा शेख, अन्वर जलालखा पठाण, हाफीज मुमताजुद्दीन शेख (सर्व रा. परळी, जि. बीड) सादिक मोहम्मद यासीन मोहम्मद, फारुख नबी शेख (रा. बीड) या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला घातक शस्त्रासह ताब्यात घेतले होते. तेव्हा अंधाराचा फायदा घेऊन तीन आरोपी पसार झाले होते. या आरोपींना पोलिस कोठडी असताना स्थागुशाचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर, भादा ठाण्याचे सपोनि. महावीर जाधव यांनी अधिक तपास केला असता त्यांनी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचे निष्पन्न झाले होते. अधिक तपासासाठी व फरार आरोपींच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आली होती. पोनि. बावकर यांच्या नेतृत्वाखालील तीन पथके या गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. दरम्यान स्थागुशाच्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे टोळीतील आणखीन एक साथीदार समीर शमशुद्दीन शेख (रा. बीड) यास ५ लाख ७२ हजारांचा प्रतिबंधित गुटखा व ८ लाखांच्या कारसह ताब्यात घेण्यात आले आहे.
चार लाखांचे साहित्य ताब्यात
या आरोपींनी जिल्ह्यातील विविध ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी दुकानाचे शटर तोडून चोरलेला, लपवून ठेवलेला विविध प्रकारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात सिगारेट, तांदूळ, साबण, तंबाखू, गोडतेल, काजू , बदाम आदी प्रकारचा असून त्याची किंमत ४ लाख आहे.
गुन्ह्यातील वाहन, साहित्य जप्त
गुन्हेगारांनी जिल्ह्यातील रेणापूर, चाकूर, वाढवणा, उदगीर शहर, किनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक तर अहमदपूर ठाण्याच्या हद्दीत चोरीचे तीन असे एकूण ९ गुन्ह्यांची उकल झाली आहे. गुन्ह्यातील वाहन व साहित्य असा एकूण २४ लाख ८० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
विविध जिल्ह्यात चोरी
या टोळीने जिल्ह्यात तसेच शेजारील बीड, परभणी, कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तपास सुरू असून आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. टोळीतील उर्वरित आरोपींच्या शोधासाठी स्थागुशा तसेच भादा ठाण्याची पथके रवाना करण्यात आली.