Kolhapur Crime: गांधीनगरात किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, चारजणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:59 IST2025-07-08T11:58:58+5:302025-07-08T11:59:42+5:30
तीन अल्पवयीन ताब्यात, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

Kolhapur Crime: गांधीनगरात किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, चारजणांना अटक
गांधीनगर : किरकोळ कारणावरून शिवीगाळ केल्याने दगड आणि लाकडी बॅटने मारहाण करून सातजणांनी तरुणाचा खून केला. ही घटना गांधीनगर (ता. करवीर) येथे घडली. आशुतोष सुनील आवळे (वय २६, सध्या रा. आसुर्ले पोर्ले, ता. पन्हाळा) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शिताफीने तपास करत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले. शंकर बापू बनसोडे (१९), राजू सचिन काळोखे (२०), शुभम संजय कांबळे (१९), करण महेश डांगे (१८, सर्व रा. गांधीनगर) आणि तीन विधिसंघर्षग्रस्त बालके अशा सातजणांना गांधीनगर (ता. करवीर) पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
याबाबत पाेलिसांतून मिळालेली माहिती अशी, रविवारी रात्री उशिरा आपल्या मुलाचा मृतदेह गांधीनगर येथील पंचगंगा नदीच्या काठावर आढळला आहे, अशी माहिती सुनील आवळे यांनी पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह येथील वसाहत रुग्णालयात पाठविला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी यावेळी सांगितले. त्यानंतर सुनील यांनी मुलाचा खून झाल्याची फिर्याद साेमवारी पोलिसांत दिली.
दरम्यान, पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सूचना देऊन मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सांगितले. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह चार तपास पथके तयार करून तपास सुरू केला. अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, कोयना वसाहत येथून करण डांगे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला.
त्याने सांगितलेल्या माहितीनुसार, करण, मित्र शंकर बनसोडे, राजू काळोखे, शुभम कांबळे आणि इतर तीन विधिसंघर्षग्रस्त बालके शनिवारी (दि. ५) रात्री ११ वाजता मोबाइलवर गेम खेळत होते. त्यावेळी आशुतोष आवळे त्याठिकाणी आला. नशेत असलेल्या आशुतोषने करण यास इथे काय करताय असे विचारत शिवीगाळ केली. तसेच आशुतोषने आपल्याकडील एडका हे हत्यार दाखवून मारहाण करू लागला. त्यामुळे करणने मित्रांसह आशुतोषला दगड, लाकडी बॅटने मारहाण केली. यामध्ये आशुतोषचा मृत्यू झाला.
त्याचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर सर्वांनी मिळून पंचगंगा नदीच्या शांतीप्रकाश घाटावर नदीकाठावर त्याचा मृतदेह फेकून दिला. साेमवारी सर्वजण पळून जाण्याच्या तयारीत होते. करण याला घरातून, शंकर, राजू यांना तावडे हॉटेल परिसर येथून, तर शुभम आणि इतरांना गांधीनगर परिसर, कावळा नाका, एस. टी. स्टँड परिसरातून ताब्यात घेतले.