Kolhapur: गांधीनगरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून, हल्लेखोर पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 11:35 IST2025-01-11T11:35:12+5:302025-01-11T11:35:29+5:30
गांधीनगर : गांधीनगर (ता. करवीर) येथे विठ्ठल सुभाष शिंदे (वय २४, मूळ गाव परभणी, सध्या रा. कोयना वसाहत, गांधीनगर) ...

Kolhapur: गांधीनगरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून, हल्लेखोर पसार
गांधीनगर : गांधीनगर (ता. करवीर) येथे विठ्ठल सुभाष शिंदे (वय २४, मूळ गाव परभणी, सध्या रा. कोयना वसाहत, गांधीनगर) या तरुणाचा तलवार आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. सुमारे पाच ते सहा संशयित मारेकरी हे येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील असल्याचे समजते. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, विठ्ठल हा आई, वडील, बहीण आणि भावासोबत कोयना कॉलनी गांधीनगर येथे भाड्याच्या घरात राहत होता. येथील गांधी मैदानाच्या मागील बाजूस असणाऱ्या कुमार पान शॉपपासून मारेकऱ्यांनी विठ्ठल याला तलवार आणि कोयत्याचे वार करत बाजूच्या जीपी ग्रुपपर्यंत पाठलाग करत व वार करत आणले. त्याठिकाणी त्याला मारून टाकून मारेकरी पळून गेले.
मारेकऱ्यांनी विठ्ठलच्या हातावर तसेच चेहऱ्यावर तलवार आणि कोयत्याने वार केले होते. विठ्ठल हा येथील एका कापड दुकानात नोकरी करत होता. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. दरम्यान, घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी भेट दिली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ करत आहेत.
नातेवाईकांचा आक्रोश
गांधीनगर वसाहत रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर त्या ठिकाणी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. नातेवाईकांनी मारेकऱ्यांना ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवणार नाही, अशी भूमिका घेतली. पोलिसांनी संशयितांना अटक करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले पण नातेवाईक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.
संशयितांना लवकरच ताब्यात घेऊ
बघ्यांना पांगवण्यसाठी पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. अखेर पोलिसांनी संशयितांना लवकरच ताब्यात घेण्याचे आश्वासित केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.