Kolhapur crime: आर्थिक वादातून भरदिवसा युवकाचा खून, संशयित दोघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 18:32 IST2023-04-03T18:29:20+5:302023-04-03T18:32:04+5:30
भरदिवसा खुनाच्या या घटनेने हातकणंगले परिसरात एकच खळबळ

Kolhapur crime: आर्थिक वादातून भरदिवसा युवकाचा खून, संशयित दोघे ताब्यात
दत्ता बिडकर
हातकणंगले : येथील लक्ष्मी औद्योगीक वसाहत येथील वेद इंडस्ट्रीज शेजारी आज, सोमवारी दुपारच्या सुमारास एका युवकाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली. रामचंद्र तुकाराम खिलारे (वय २७ रा. इंडस्ट्री रोड, हातकणंगले) असे मृत युवकाचे नाव आहे. हा खून आर्थिक वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपासाची गतिमान चक्रे फिरवून संशयित दोघांना ताब्यात घेतले आहे.
आज, दुपारच्या सुमारास आर्थिक देवघेवीच्या कारणावरून रामचंद्र खिलारे याचा धारधार कोयत्याने गळा, तोंड आणि मानेवर सपासप वार करून दोघानी खून केला. भरदिवसा खुनाच्या या घटनेने हातकणंगले परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली.
तर, तात्काळ तपासाची चक्रे फिरवून संशयित बाळू विनोद जाधव (रा. हातकणंगले) आणि कपील बजरंग जाधव (रा. रुई) या दोघाना शिताफीने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.