वासराच्या अंगावर गाडी घालणाऱ्या तरुणाला अटक, कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 12:08 IST2025-08-23T12:07:44+5:302025-08-23T12:08:06+5:30
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तातडीने पोलिसांनी दखल घेतली

वासराच्या अंगावर गाडी घालणाऱ्या तरुणाला अटक, कोल्हापुरातील घटना
कोल्हापूर : रस्त्याच्या मध्यभागी बसलेल्या वासराच्या अंगावर कार घालून त्याला ठार मारणाऱ्या तरुणास राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हर्ष संजय संकपाळ (वय २४, रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रशांत बबन साठे (वय ३७, रा. राजारामपुरी, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली.
बुधवारी (दि. २०) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सरनाईक कॉलनी, माळी कॉलनी, टाकाळा परिसरात रस्त्याच्या मध्यभागी खिल्लारी गायीचे लहान वासरू बसले होते. त्यावेळी संशयित हर्ष संकपाळ हा कारमधून घरी जात होता. रस्त्यात वासरू बसलेले पाहूनदेखील कार पुढे नेली. त्याने वासराच्या अंगावर कार घालून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सोशल मीडियावर व्हायरल
वासराच्या अंगावर कार घालून त्यास ठार करणाऱ्या संकपाळ याचा व्हिडीओ नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्याची तातडीने पोलिसांनी दखल घेत सीसीटीव्ही फूटेज तपासले. वाहनाच्या क्रमांकावरून आरोपीपर्यंत पोहोचले. अर्ध्या तासात राजारामपुरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.