कोल्हापूर : आजोबांनी मोबाइल दिला नसल्याच्या रागातून शर्वरी भिकाजी फराकटे (वय १७, रा. रायगड कॉलनी, पाचगाव) या युवतीने राहत्या घरात छताच्या हुकाला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. ९) सकाळी अकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी शर्वरी हिच्या नातेवाइकांचा जबाब नोंदविला असून, त्यात मोबाइल न दिल्याच्या रागातून तिने आत्महत्या केल्याचा उल्लेख केला आहे.करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्वरी ही रायगड कॉलनी येथे आजी, आजोबा आणि लहान भावासोबत राहत होती. तिच्या वडिलांचे निधन झाले असून, आई माहेरी असते. मोबाइल मिळावा यासाठी तिने आजोबांकडे आग्रह धरला होता. मोबाइलचा सारखा वापर करू नको, असे तिला आजोबांनी सांगितले होते.
तसेच स्वतंत्र मोबाइल देण्यास नकार दिला होता. याच रागातून तिने गळफास लावून घेतला. आजोबांनी तिला वाचवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. मात्र, यात यश आले नाही. क्षुल्लक कारणातून नातीने टोकाचे पाऊल उचलल्याने आजी-आजोबांना धक्का बसला. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.