Kolhapur Crime: पत्नीशी चॅटिंग; तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण, सहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:52 IST2025-07-29T12:50:57+5:302025-07-29T12:52:08+5:30

आठवड्यापूर्वी तुरुंगातून सुटलेल्या गुन्हेगाराकडून प्रकार 

Young man kidnapped and beaten by criminals in a tavern over anger over chatting with his wife on mobile in kolhapur | Kolhapur Crime: पत्नीशी चॅटिंग; तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण, सहा जणांना अटक

Kolhapur Crime: पत्नीशी चॅटिंग; तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण, सहा जणांना अटक

कोल्हापूर : पत्नीशी मोबाइलवर चॅटिंग केल्याच्या रागातून सराईत गुन्हेगार ऋतुराज दत्तात्रय भिलुगडे (वय २५, रा. मोरेवाडी, ता. करवीर) याने पाच साथीदारांच्या मदतीने आदिनाथ कृष्णात कुईगडे (३०, रा. शिंगणापूर, ता. करवीर) याचे अपहरण करून बेदम मारहाण केली. हा प्रकार रविवारी (दि. २७) रात्री उशिरा घडला. याबाबत अपहृत आदिनाथ याची पत्नी श्रृतिका कुईगडे (२३, रा. शिंगणापूर) यांनी करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली.

ऋतुराज भिलुगडे याच्यासह आकाश उर्फ करण दत्तात्रय भिलुगडे (२८), अक्षय सुरेश भिलगुडे (२८), अभय बाळासाहेब मोरे (२३), इंद्रजित बाबासो मोरे (३१), कुलदीप साताप्पा कोथळे (२८) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ऋतुराज भिलुगडे याला विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्या गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडीत होता. २० जुलैला त्याची सुटका झाली.

दरम्यानच्या काळात आदिनाथ हा ऋतुराजच्या पत्नीला मोबाइलवर मेसेज पाठवून चॅटिंग करीत होता. कारागृहातून आल्यानंतर हा प्रकार पत्नीने ऋतुराजला सांगितला. रविवारी रात्री दहाच्या सुमारास ऋतुराज पाच साथीदारांसह शिंगणापूर येथे आदिनाथच्या घरी गेला. लाथा मारून दरवाजा तोडून ते घरात शिरले. मारहाण करीत जबरदस्तीने त्याला पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून घेऊन गेले. कारमध्येच त्याला बेदम मारहाण केली.

दरम्यान, आदिनाथच्या पत्नीने करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन पतीचे अपहरण झाल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला. मारहाणीत आदिनाथ गंभीर जखमी झाल्याचे लक्षात येताच त्याला वाटेत सोडून अपहरणकर्ते निघून गेले. कातडी पट्टा, काठी, सळई आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने जखमी अवस्थेतील आदिनाथ याला रुग्णालयात दाखल केले.

आठवड्यात पुन्हा कोठडीत

पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून रात्रीत सहा आरोपींना अटक केली. अटकेतील सर्वच आरोपी सराईत असून, त्यांच्यावर यापूर्वी मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. मुख्य आरोपी ऋतुराज हा २० जुलैला कारागृहातून सुटला होता. आठ दिवसांत अपहरण आणि मारहाणीच्या गुन्ह्यात त्याची पुन्हा पोलिस कोठडीत रवानगी झाली. सहा जणांना ३१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. पोलिसांनी गुन्ह्यातील कार जप्त केली.

Web Title: Young man kidnapped and beaten by criminals in a tavern over anger over chatting with his wife on mobile in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.