कोल्हापूर जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’, मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 12:31 IST2025-09-13T12:29:36+5:302025-09-13T12:31:19+5:30
काल, शुक्रवारी दुपारी जिल्ह्यासह शहराच्या उपनगरात जोरदार पाऊस झाला

कोल्हापूर जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’, मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस
कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला असून आज, शनिवारपासून पाऊस पुन्हा सुरू होणार आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ‘येलो अलर्ट’ दिला असून घाट माथ्यावर जोरदार तर इतर ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे उसंत घेतली होती. एकसारख्या पावसामुळे सर्वच घटकांना त्रास झाला आहे. त्यामुळे कडकडीत ऊन पडल्याने शेतातील कामांसाठी धांदल उडाली आहे. काल, शुक्रवारी दुपारी जिल्ह्यासह शहराच्या उपनगरात जोरदार पाऊस झाला. पंधरा ते वीस मिनिटे पावसाने अक्षरशा झोडपून काढल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता.
दरम्यान, आजपासून पाऊस पुन्हा सुरुवात करणार आहे. साधारणता बुधवार (दि. १७) पर्यंत जिल्ह्यात पाऊस राहील आणि त्यानंतर पुन्हा उघडीप देईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. आज, दिवसभरात घाट माथ्यावर मेघगर्जनेसह पाऊस होईल आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे.
औषध फवारणीसाठी झुंबड
यंदा मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उसासह इतर खरीप पिकांची मशागत करता आलेली नाही. परिणामी उसामध्ये तण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. साखर कारखान्यांचा हंगाम महिन्याभरात सुरू होणार आहे. त्यात पावसाने चांगली उघडीप दिल्याने उसातील तणावर औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांची अक्षरशा झुंबड उडाली आहे.
पावसाची उघडीप तरीही पडझड
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात तीन खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. पावसाची उघडीप असली तरी पडझड होऊन दीड लाखांचे नुकसान झाले आहे.