यळगूडकरांची अशुद्ध पाण्यावर गुजराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:06+5:302021-01-20T04:25:06+5:30

यळगूड गावात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून निर्माण झालेली पाणीटंचाई कधी आणि कोण दूर करणार? अशा विवंचनेत ग्रामस्थ आहेत. ...

Yalgudkar's livelihood on unclean water | यळगूडकरांची अशुद्ध पाण्यावर गुजराण

यळगूडकरांची अशुद्ध पाण्यावर गुजराण

यळगूड गावात गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून निर्माण झालेली पाणीटंचाई कधी आणि कोण दूर करणार? अशा विवंचनेत ग्रामस्थ आहेत. गावातील पाणीटंचाईमुळे पाच वर्षांत जवळपास दोन हजारांहून अधिक ग्रामस्थांनी स्थलांतर केल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, याबाबतचे सोयरसुतक गावच्या कारभाऱ्यांना अजिबात असल्याचे दिसत नाही. रेंदाळ व रणदिवेवाडी यांचीही तहान यापूर्वी या गावाने उदारमनाने भागविली आहे.

सध्या, मात्र उन्हाळा सुरू होण्याआधीच गावाला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून गावात पाणीटंचाई निर्माण होऊन देखील दुर्दैवाने एकही नेता स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत नाही. केवळ कागदी घोडे नाचविण्यातच कारभारी व्यस्त आहेत. गावाला दहा ते पंधरा दिवसांतून एकदा तोही अत्यल्प प्रमाणात रात्री अपरात्री पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी मिळविण्यासाठी विशेषतः महिला वर्गाला रात्री जागून काढाव्या लागत आहेत.

चौकट: 1)ग्रामपंचायतीकडून होणारा अत्यल्प पाणी पुरवठा विचारात घेत ग्रामस्थांना सार्वजनिक व खासगी बोअर तसेच जवाहर साखर कारखाना पंपहाऊस आदींच्या माध्यमातून पाण्याची गरज भागवावी लागत आहे. तसेच कपडे धुणे व जनावरांसाठी गाव तलावातील दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर करावा लागत आहे.

)ग्रामस्थ सध्या राजकारणाची विचित्र अशी परिस्थिती अनुभवत आहेत. गेल्या पन्नास वर्षांपासून गावाची सत्ता आपल्या हातात ठेवणारा वसंतराव मोहिते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे गट या ठिकाणी भाजपच्या नेतृत्वाखालील सत्तेत कार्यरत आहेत. या तिघांचे मिळून १५ सदस्य असतानाही त्यांच्याकडे गावच्या विकासाचा ठोस असा काही अजेंडाच नाही. त्यामुळे गावच्या राजकारणात कुणाचा पायपोस कुणालाही नसल्याचा विचित्र अनुभव ग्रामस्थ घेत आहेत.

-------::--------

फोटो ओळी-यळगूड(ता.हातकणंगले) गावामध्ये सातत्याने निर्माण होत असलेल्या पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामसेवक शशिकांत कांबळे यांना आज निवेदन दिले.

Web Title: Yalgudkar's livelihood on unclean water