कोल्हापुरातील शिरोली येथे फौंड्रीत स्फोट, कामगार ठार; स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:05 IST2026-03-19T12:05:05+5:302026-03-19T12:05:48+5:30
अचानक वीजपुरवठा खंडित झाला. काही वेळातच हिट ट्रीटमेंटच्या भट्टीचा मोठा आवाज होऊन भीषण स्फोट

कोल्हापुरातील शिरोली येथे फौंड्रीत स्फोट, कामगार ठार; स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला
शिरोली : शिरोली औद्योगिक वसाहतीमधील फौंड्रीत हिट ट्रीटमेंट भट्टीचा भीषण स्फोट होऊन कामगार ठार झाला. राहुल मुकुंद कांबळे (वय ३८, रा. इंगरूळ, ता. शिराळा, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. १७) रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की, संपूर्ण परिसर हादरून गेला.
अधिक माहिती अशी की, राहुल कांबळे हा गेल्या सहा वर्षांपासन शिरोली एमआयडीसीमधील एका फौंड्रीत काम करत होता. मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास राहुल अन्य तीन सहकाऱ्यांसह कंपनीत काम करत होता. याचदरम्यान अचानक वीजपुरवठा खंडित झाला. वीज गेल्याच्या काही वेळातच हिट ट्रीटमेंटच्या भट्टीचा मोठा आवाज होऊन भीषण स्फोट झाला. या स्फोटाच्या तडाख्यात राहुल सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, आसपासच्या कंपन्यांमधील कामगारही भीतीपोटी बाहेर आले. या घटनेची माहिती मिळताच कंपनी मालकांनी तातडीने धाव घेतली आणि शिरोली पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व मृतदेह कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवला. या घटनेची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड करत आहेत.