कोल्हापूर : कळंबा येथील मनोरमा कॉलनीतील गॅस स्फोटप्रकरणी पाइपलाइनच्या जोडणीचे काम केलेल्या उत्तर प्रदेशच्या कामगारास शुक्रवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. महंमद हबीबुंरहमान उजेरअल्बी (वय २७, सध्या रा. लकी बझार जवळ, राजारामपुरी, मूळ रा : मोहल्ला सराय, गुन्नोर, जि.संभल, राज्य - उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल असलेले हिंदूस्थान पेट्रोलियम कॉर्पाेरेशन लिमिटेड व ऑइल इंडिया लिमिटेड कंपनीचा कोल्हापूर विभागचा प्रमुख अधिकारी गौरव गुणानंद भट (वय ३४,सध्या रा. दाभोळकर कॉर्नर, कोल्हापूर, मूळ रा. अठूरवाला, डेहराडून, उत्तराखंड), घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या कामावर देखरेख करणाऱ्या इडिप्लस इंजिनीअरिंग ग्लोबल प्रा. लि. कंपनीचा इंजिनीअर हरीश दादासाहेब नाईक (वय ३१, रा. पोखले, ता. पन्हाळा), पाइपलाइनचे काम करणाऱ्या पुण्यातील सीतामाता कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रमुख अमोल टी जाधव (रा. पर्वती, पुणे) हे अजून मोकाट आहेत.
वाचा - Kalamba Gas Explosion: गॅसलाइनची 'एंडकॅप'; भोजणे कुटुंबाचा 'एंड'पोलिसांनी सांगितले की, एचपी ऑइल गॅस कंपनीने शहरातील घरांमध्ये पाइपलाइनद्वारे गॅसचा पुरवठा करण्याचे काम पुण्यातील सीमातामा कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. कंपनीचे कर्मचारी आणि पोलिसांनी अटक केलेले उजेरअल्बी यांनी २५ ऑगस्टला कळंबा येथील मनोरमा कॉलनीतील अमर भोजणे यांच्या घरात गॅस पाइपलाइनची जोडणी केली होती. मात्र, पाइपला इन्डकॅप लावली नव्हती. कॅप व मीटर न लावताच मुख्य वाहिनीतून गॅसपुरवठा सुरू केल्याने भोजणे यांच्या घरात गॅसची गळती झाली. त्याचा स्फोट झाल्याने शीतल भोजणे, त्यांचे सासरे अनंत भोजणे, मुलगा प्रज्वल, मुलगी इशिका हे चौघे गंभीर जखमी झाले होते. यातील इशिका वगळता इतर तिघांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. २४ ऑगस्टला घटना घडूनही यातील संशयितांना अटक करण्यास टाळाटाळ होत असल्याचाही आरोप होत होता. यामुळे पोलिसांनी या प्रकरणात शेवटी एकास अटक केली आहे. उर्वरित तिघांना कधी अटक करणार याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे.