महिलांनी लैंगिक शोषणासह मानसिक त्रासाविरोधातही तक्रारी द्याव्यात - रूपाली चाकणकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:43 IST2025-10-03T12:43:00+5:302025-10-03T12:43:39+5:30
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पॉश कायद्यासंबंधी प्रशिक्षण

महिलांनी लैंगिक शोषणासह मानसिक त्रासाविरोधातही तक्रारी द्याव्यात - रूपाली चाकणकर
कोल्हापूर : ‘पॉश कायदा २०१३’ (कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण) मध्ये लैंगिक शोषणासह मानसिक त्रास देणेही गुन्हा आहे. या त्रासाने पीडित असलेल्या महिलांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन महिला आयोगाच्या राज्य अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आयोजित ‘पॉश कायदा २०१३’ या विषयावरील प्रशिक्षण सत्रात त्या बोलत होत्या. महिला आयोग, जिल्हा महिला व बाल कल्याण विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.
चाकणकर म्हणाल्या, प्रत्येक कामाच्या ठिकाणी पॉश कायदा लागू आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय, खासगी आस्थापना, संस्थांमध्ये तक्रार निवारण समित्यांची स्थापना करणे आवश्यक आहे. महिलांनी धाडसाने पुढे येऊन कामाच्या ठिकाणी स्थापन केलेल्या समितीकडे तक्रारी दाखल कराव्यात.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व कार्यालयांत पॉश समित्या स्थापन झाल्या आहेत. याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. लक्ष्मी मुक्ती योजनेसह जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाचे उपक्रमही राबवले जातात.
सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी प्रशिक्षण सत्राचा उद्देश सांगितला. आयोगाने तयार केलेल्या माहिती घडी पत्रिकेचे अनावरण करण्यात आले. प्रशिक्षक अमृता करमरकर यांनी कायद्याची सविस्तर माहिती दिली. महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, प्रशिक्षक अमृता करमरकर, सुजित इंगवले यांच्यासह विविध आस्थापनेतील अधिकारी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.