Kolhapur Crime: पैशांच्या वसुलीपोटी महिलेवर बलात्कार; अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:35 IST2025-02-25T15:35:30+5:302025-02-25T15:35:52+5:30
कोल्हापूर : दरमहा १० टक्के व्याजाने दिलेल्या ७० हजार रुपयांच्या वसुलीसाठी खासगी सावकार रामा विठ्ठल जानकर (वय ४६, रा. ...

Kolhapur Crime: पैशांच्या वसुलीपोटी महिलेवर बलात्कार; अश्लील फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी
कोल्हापूर : दरमहा १० टक्के व्याजाने दिलेल्या ७० हजार रुपयांच्या वसुलीसाठी खासगी सावकार रामा विठ्ठल जानकर (वय ४६, रा. शिवप्रसाद कॉलनी, कदमवाडी) याने महिलेवर बलात्कार केला. दारू पाजून काढलेले महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार २०१४ ते जून २०२४ या काळात घडला. पीडित महिलेने फिर्याद देताच शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी (दि. २४) खासगी सावकार जानकर याला अटक केली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने कौटुंबीक अडचणीतून रामा जानकर या खासगी सावकाराकडून ७० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मुद्दल आणि दरमहा १० टक्के व्याजाने हप्ते परत करायचे होते. कालांतराने कर्जाचे हप्ते थकल्याने जानकर याने वसुलीसाठी तगादा लावला. वेळेत हप्ते देणार नसल्यास शरीरसंबंध ठेवायला लागतील, असे सांगून वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला.
दारू पाजून मोबाइलवर तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा बलात्कार केला. थकलेल्या कर्जाची रक्कम तीन लाख रुपये असल्याचे सांगून तिचे राहते घर स्वत:च्या मर्जीने विकत असल्याचे स्टॅम्पपेपरवर लिहून घेतले. त्याच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने सोमवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने जानकर याला अटक केली.