भिंत कोसळून महिला ठार; दुर्घटनेत पती व नणंद जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 11:26 IST2023-07-27T10:39:14+5:302023-07-27T11:26:42+5:30
दुर्घटनेतील जखमींना नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

भिंत कोसळून महिला ठार; दुर्घटनेत पती व नणंद जखमी
सदाशिव मोरे
कोल्हापूर - आजरा तालुक्यातील किणे येथे राहत्या घराची भिंत कोसळून सुनिता अर्जुन गुडूळकर ( वय 45 ) या मयत झाल्या आहेत तर त्यांचे पती अर्जुन गुडूळकर व वत्सला गुडूळकर जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी पाच ते सहा च्या दरम्यान घडली आहे. जखमीना नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच तातडीने तहसिलदार समीर माने, गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, निवासी नायब तहसिलदार म्हाळसाकांत देसाई यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
पहाटे चार वाजता गावात मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामध्येच पाचच्या दरम्यान गुडूळकर यांच्या घराची भिंत कोसळली. मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व तातडीने मदत कार्य सुरू केले. दोघा जखमींसह मयत सुनिता गुडुळकर यांना मातीच्या ढिगार्यातून बाहेर काढले. सर्वांना तातडीने नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.