जेसीबीच्या चाकाखाली सापडून महिला ठार, कोल्हापुरातील रंकाळा टॉवरजवळ अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 14:52 IST2022-12-31T14:51:06+5:302022-12-31T14:52:18+5:30
जेसीबी बकेटचा धक्क्यात दुचाकीवरुन पडल्याने सापडल्या चाकाखाली

जेसीबीच्या चाकाखाली सापडून महिला ठार, कोल्हापुरातील रंकाळा टॉवरजवळ अपघात
उद्धव गोडसे
कोल्हापूर : रंकाळा टॉवरजवळ जेसीबीच्या बकेटचा धक्का लागून पडलेली दुचाकीवरील महिला जेसीबीच्या चाकाखाली सापडून ठार झाली. अनुराधा मिलिंद पोतदार (वय ४६, रा. फुलेवाडी, चौथा बसस्टॉप, कोल्हापूर) असे मृत महिलेचे नाव आहे. पोतदार दवाखान्यात ड्युटीवर निघाल्या होत्या. या अपघातात पती मिलिंद पोतदार किरकोळ जखमी झाले. आज, शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला.
फुलेवाडीतील चौथ्या बस स्टॉपजवळ राहणा-या अनुराधा पोतदार सूर्या हॉस्पिटलमध्ये रिसेप्सनिस्ट म्हणून नोकरी करीत होत्या. शनिवारी सकाळी त्या दुचाकीवरून पतीसोबत हॉस्पिटलकडे निघाल्या होत्या. दरम्यान, जेसीबीच्या बकेटचा धक्का दुचाकीला लागला. यावेळी दुचाकीवरुन पडून अनुराधा जेसीबीच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली सापडल्या. अनुराधा यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
अपघाताची माहिती मिळताच सूर्या हॉस्पिटलमधील कर्मचा-यांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. अनुराधा यांचे पती मिलिंद हे उद्यमनगरमधील एका खासगी कंपनीत काम करतात. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.