Kolhapur- तीव्र वळणावर मोटारसायकलवरून पडून महिला ठार, राशिवडे ते चांदे मार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 17:37 IST2023-06-15T17:37:06+5:302023-06-15T17:37:13+5:30
डोक्यावर जोरात आपटल्याने डोक्यास गंभीर इजा

Kolhapur- तीव्र वळणावर मोटारसायकलवरून पडून महिला ठार, राशिवडे ते चांदे मार्गावरील घटना
राशिवडे : चांदे (ता राधानगरी) येथील पुतणीच्या वास्तुशांती कार्यक्रमासाठी जाताना घाटातील तीव्र वळणावर मोटारसायकलवरून तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने कल्पना नारायण कुरणे (वय ४२, रा. कसबा बावडा, कोल्हापूर) ही महिला जागीच ठार झाली. राशिवडे ते चांदे मार्गावरील घाटात बुधवारी दुपारी ही दुर्घटना घडली.
चांदे येथील यल्लाप्पा कांबळे यांच्या नवीन बांधलेल्या घराच्या वास्तुशांतीसाठी त्या कसबा बावडा येथून मोटारसायकलवरून आल्या होत्या. राशिवडे मार्गावरून चांदे गावाकडे जाताना एका तीव्र वळणावर मोटारसायकलवरून तोल जाऊन त्या खाली पडल्या. डांबरी रस्त्यावर डोक्यावर जोरात आपटल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर इजा झाली.
अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी त्यांना राशिवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरनी सांगितले. त्यांचे माहेर केळोशी बु।। असून विद्यमान सरपंच भारती राऊ कांबळे यांची ती भाची आहे. कोल्हापूर येथील सीपीआर येथे नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.