Kolhapur: देवदर्शनाला गेलेल्या गोव्यातील महिलेचा अपघातात मृत्यू, पतीसह दोन मुले जखमी; आजऱ्याजवळ झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:00 IST2025-03-31T17:59:40+5:302025-03-31T18:00:01+5:30
गडहिंग्लज : देवदर्शन करून गोव्याला परतताना कारगाडी उलटून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंकिता अजित भोसले (वय ५०) ३२०, पोर्याचा ...

Kolhapur: देवदर्शनाला गेलेल्या गोव्यातील महिलेचा अपघातात मृत्यू, पतीसह दोन मुले जखमी; आजऱ्याजवळ झाला अपघात
गडहिंग्लज : देवदर्शन करून गोव्याला परतताना कारगाडी उलटून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंकिता अजित भोसले (वय ५०) ३२०, पोर्याचा वाडो, कामोलीम म्हापसा, गोवा असे त्यांचे नाव आहे. आजरा-बांदा महामार्गावर आजरा शहरानजीकच्या धनगरमोळा येथील धोकादायक वळणावर हा अपघात झाला.
आजरा पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गोव्यातील भोसले कुटुंबीय अक्कलकोट, शिर्डी येथे देवदर्शनासाठी मोटारीतून (जी.ए.०५, डी १८७५) गेले होते. देवदर्शनानंतर ते परत गोव्याला जात होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री वाटेत जेवण करून ते गोव्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी धनगरमोळा येथे पहाटेच्या सुमाराला कारचालक आशिष याचा गाडीवरील ताबा अचानक सुटला. त्यामुळे रस्त्यालगतच्या जाहिरातीच्या फलकाला धडकून गाडी उलटली.
अपघातात अंकिता यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती अजित, मुले आशिष व लंकेश हे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आजरा पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.
धोकादायक वळण..!
आजरा ते आंबोली दरम्यान धनगरमोळानजीक इंग्रजी ''एस'' आकाराचे धोकादायक वळण आहे. त्यामुळेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे. हा अपघातही याच वळणावर झाला आहे. वेळोवेळी तक्रार करूनही संबंधितांनी त्याची दखल घेतलेली नाही, अशी परिसरातील नागरिकांची तक्रार आहे.
मोठ्या आवाजामुळे..!
धोकादायक वळणावरील रस्त्यालगतच्या जाहिरातीच्या होर्डिंगला धडकल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे जाग आलेल्या परिसरातील नागरिकांनी जखमींना आजरा ग्रामीण रुग्णालयात पोहचवले.