कोल्हापुरातील सीपीआरमध्ये महिलेला उंदीर चावला; सततच्या त्रासाने रुग्ण, नातेवाईक, आरोग्य यंत्रणा त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:50 IST2025-06-03T12:49:33+5:302025-06-03T12:50:38+5:30
रुग्णाच्या बेडशेजारी त्या झोपल्या होत्या. सोमवारी पहाटे पायाच्या बोटाला वेदना झाल्याने त्यांना जाग आली. उठून पाहिले असता उंदराने चावल्याचे लक्षात आले.

कोल्हापुरातील सीपीआरमध्ये महिलेला उंदीर चावला; सततच्या त्रासाने रुग्ण, नातेवाईक, आरोग्य यंत्रणा त्रस्त
कोल्हापूर : सीपीआरच्या अनेक इमारतींमध्ये उंदरांचा उच्छाद वाढला आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या नातेवाइकाच्या शुश्रूषेसाठी आलेल्या पद्मिनी सुनील लोखंडे (वय ५०, रा. शेणे, ता. वाळवा, जि. सांगली) यांना उंदराने चावा घेतला. ही घटना सोमवारी (दि. २) पहाटे दूधगंगा इमारतीत घडली. सीपीआरमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
सीपीआर पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, पद्मिनी लोखंडे या नातेवाइकांच्या शुश्रूषेसाठी सीपीआरमध्ये आल्या होत्या. दूधगंगा इमारतीत रुग्णाच्या बेडशेजारी त्या झोपल्या होत्या. सोमवारी पहाटे पायाच्या बोटाला वेदना झाल्याने त्यांना जाग आली. उठून पाहिले असता उंदराने चावल्याचे लक्षात आले. रक्तस्राव वाढल्याने त्यांनी अपघात विभागात उपचार घेतले. त्यानंतर त्या गावाकडे गेल्या.
सीपीआरमध्ये सध्या इमारतींचे नूतनीकरण सुरू आहे. जुन्या साहित्याची अडगळ हटवल्याने बाहेर पडलेले उंदीर लपण्यासाठी नवीन जागा शोधत आहेत. त्यामुळे अनेक वॉर्डांमध्ये दिवसाही उंदीर फिरताना दिसताना. आता उंदराने चावा घेतल्याची घटना घडल्याने याचे गांभीर्य वाढले आहे. प्रशासनाने उंदरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे.
वैद्यकीय उपकरणांना धोका
सीपीआरच्या विविध विभागांत महागडी अद्ययावत उपकरणे, संगणक, उपचाराची साधने आहेत. उंदरांकडून या उपकरणांना धोका आहे. उपकरणांचे वायरिंग कुरतडल्यास मोठे नुकसान होऊ शकते. रुग्णांच्या जीवालाही यातून धोका निर्माण होऊ शकतो. सीपीआरमध्ये नेहमीच औषधांचा मोठा साठा असतो. उंदरांमुळे औषधांचा साठा खराब होऊ शकतो. स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे तातडीने उंदरांचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे काही इमारतींमध्ये उंदीर सैरावैरा धावताना दिसतात, ही वस्तुस्थिती आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व इमारतींमध्ये पेस्टिसाइड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. - डॉ. राजेंद्र मदने - वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर